महागाई दरात घट तर औद्योगिक उत्पादन निर्देशांकात वाढ
प्रथमेश तेलंग
नवी दिल्ली : देशातील किरकोळ महागाई दर घटून ४.७५ टक्क्यांवर आला असून ही मागच्या वर्षभरातील निचांकी टक्केवारी असल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने बुधवारी (दि.१२) जाहीर केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
देशाच्या औद्योगिक उत्पादनाच्या निर्देशांकात मागच्या वर्षीच्या एप्रिल महिन्याच्या तुलनेत ५ टक्क्यांची वाढ झाली. यंदाच्या एप्रिल महिन्यात किरकोळ महागाई दर ४.८३ टक्क्यांवर होता. मे महिन्यात त्यामध्ये घट होऊन तो ४.७५ टक्क्यांवर पोहोचल्यामुळे सामान्यांना दिलासा मिळाला आहे. महागाई दर महागाई दराचा थेट संबंध क्रयशक्तीशी असतो. उदाहरणार्थ, जर महागाई दर ६ टक्के असल्यास कमावलेले १०० रुपये फक्त ९४ रुपये असतील. त्यामुळे हा किरकोळ महागाई दर कमी असणे गरजेचे आहे.
औद्योगिक उत्पादन निर्देशांकामध्ये एप्रिल २०२३ च्या तुलनेत एप्रिल २०२४ मध्ये ५ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्यावर्षी एप्रिल महिन्यामध्ये हा निर्देशांक ४.६ टक्के होता. या वाढीसाठी प्राथमिक वस्तू, पायाभूत सुविधा/बांधकाम वस्तू आणि ग्राहक टिकाऊ वस्तू यांचे योगदान महत्वाचे आहे. या वर्षात खाण, उत्पादन आणि वीज या तीन क्षेत्रांचा विकास दर अनुक्रमे ६.७ टक्के, ३.९ टक्के आणि १०.२ टक्के असल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने स्पष्ट केले.