राज्यात बैठकांचे सत्र; जिल्ह्यात प्रचाराचे नारळ
कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपताच विधानसभेच्या जोर बैठका सुरू झाल्या आहेत. दोन्ही शिवेसनेच्या बैठकांचे सत्र मुंबईत सुरू आहे, तर जिल्ह्यात पक्षांचे जागावाटप होण्यापूर्वीच प्रचाराचे नारळ फोडले जात आहेत. त्यामुळे निवडणुकीची लगीनघाई सुरू झाली आहे. युती, आघाडीअंतर्गत शह-कटशहाचे राजकारण सुरू झाले असून, अंदाज घेत उमेदवारी आखाड्यात उतरत आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी 100 दिवसांचा कालावधी गृहीत धरून राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मिशन 100 दिवस, तर कोणाचे टार्गेट 100 दिवस या टॅगलाईनखाली वाटचाल सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीत ज्या विधानसभा मतदारसंघात ज्या पक्षांना मताधिक्य मिळाले, तेथून निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारांची पहिली पसंती असेल; मात्र एकूणच उमेदवारी मिळविण्यासाठी स्पर्धा पाहता दोन ते तीन पर्याय हाताशी ठेवून उमेदवारांची तयारी सुरू आहे. महायुतीत भाजपा, शिवसेना शिंदे गट, अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यात, तर महाविकास आघाडीत काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी व ठाकरेंची शिवसेना यांच्यात जागावाटपासाठी रस्सीखेच होणार आहे. सध्या जिल्ह्यात 4 आमदार काँग्रेस, 1 शिंदे शिवसेना, 2 अजित पवारांची राष्ट्रवादी, 1 जनसुराज्य, 1 ताराराणी पक्ष आणि 1 अपक्ष असे पक्षीय बलाबल आहे. काँग्रेसचे 4 आमदार सोडल्यास इतर 6 आमदार हे महायुतीसोबत आहेत. जनसुराज्य, ताराराणी व अपक्ष हे भाजपचे सहयोगी आमदार आहेत. त्यामुळे जागावाटपाची रस्सीखेच होणार आहे.
जागावाटपावरून आतापासूनच संघर्ष सुरू झाला आहे. जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ असलेल्या कागलमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मी कधी फोन घेतला नाही सांगा, अशी सुरुवात करत, मी नको असेल तर स्पष्ट सांगा, असे म्हणण्यापर्यंत मजल मारली आहे. मुश्रीफ हे अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार आहेत. तेथून भाजपाकडून समरजित घाटगे हे इच्छुक आहेत. त्यामुळे उमेदवारीसाठी संघर्ष अटळ आहे.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मेळावा घेत कोल्हापूर दक्षिण व उत्तर ही कोणाची जहागीर नाही, असे ठणकावत विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. त्यांनी कोल्हापूर उत्तरसोबतच दक्षिण मतदारसंघावरही दावा दाखवून राजकीय आव्हान दिले आहे.
जिल्ह्यात विविध गटांच्या संपर्क मोहिमा सुरू
करवीरमध्ये पी.एन.पाटील गटाच्या मेळाव्यानंतर नरके गटानेही स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती व्याख्यानाच्या आयोजनातून युवकांचा मेळावा घेत आपली राजकीय ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात विविध गटाच्या संपर्क मोहिमा सुरु आहेत. विधानसभेची मोर्चेबांधणी केली जात आहे.