लासलगावातून ऑस्ट्रेलिया, अमेरिकेला एक हजार टन आंबे निर्यात
लासलगाव (नाशिक) : Bharat Live News Media वृत्तसेवा – नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे भाभा अणू संशोधन केंद्राच्या कृषक विकिरण केंद्रातून आंब्यावर विकिरण प्रक्रिया होऊन १ एप्रिलपासून आंबा निर्यात केले जात असून, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाला १ हजार टन आंबा निर्यात झाला आहे. मागील हंगामातदेखील १०२३ टन आंबा निर्यात झाला होता.
लासलगाव (नाशिक) येथील कृषक केंद्रांतून अमेरिकेपाठोपाठ ऑस्ट्रेलियाला आंब्याचे कन्साईटमेंट यशस्वीरीत्या पाठविण्यात आले आहे. ९ जूनपर्यंत लासलगावमधून एक हजार टन आंबा हा निर्यात झाला असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी संजय आहेर यांनी दिली आहे. भारतातील आंब्यांना परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी असते. भारतामध्ये आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते व चवीला उत्कृष्ट असल्याने भारतीय आंब्यांना जगभरात पसंत केले जाते.
जगभरातील खवय्यांना भुरळ घालणारा कोकणचा हापूस आंब्याची परदेशवारीही यंदाही लासलगावमार्गे झाली असून, आंबे प्रक्रिया करून निर्यात झाले आहे. मागील वर्षी एकट्या अमेरिकेत एक हजार टन आंब्याची यशस्वी निर्यात लासलगाव येथील कृषकमधून झाली होती. गेल्या पंधरा वर्षांपासून अमेरिकेने ठरवून दिलेल्या मापदंडाचे काटेकोर पालन होत असल्याने भारतीय हापूस आंबा मोठ्या झपाट्याने अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि मलेशिया दिशेने कूच करू लागला आहे.
या जातीच्या आंब्यावर विकिरण प्रक्रिया
लासलगाव येथील भाभा अणू संशोधन केंद्रातून अल्फान्सो, केशर, बदाम, राजापूर, मल्लिका, हिमायत, हापूस या जातीच्या आंब्यावर विकिरण प्रक्रिया करून त्याची निर्यात केली जाते. लासलगाव येथे ३१ ऑक्टोबर २००२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या कृषी उत्पादन संशोधन केंद्र येथे हा प्रकल्प कांद्यासाठी तयार करण्यात आला होता. मात्र, येथे आता कांद्याबरोबर मसाले व आंब्यावरच येथे विकिरण करून तो निर्यात केला जात आहे. अमेरिकेत जाणाऱ्या आंब्यामध्ये हापूस, केशर, दशहरा, बेंगणपल्ली, लंगडा या प्रमुख जातींचा समावेश आहे.
आंब्याची २००७ पासून झालेली निर्यात
सन निर्यात (टन)
२००७ १५७
२००८ २७५
२००९ १२१
२०१० ९६
२०११ ८५
२०१२ २१०
२०१३ २८१
२०१४ २७५
२०१५ ३२८
२०१६ ५६०
२०१७ ६००
२०१८ ५८०
२०१९ ६८५
२०२२ ३५०
२०२३ १०२३
हेही वाचा:
नाशिकमध्ये अवघ्या दहा दिवसानंतर पुन्हा गॅसपाइपमधून गळतीचा प्रकार सुरूच; नागरिकांमध्ये घबराट
Onion News | जिल्ह्यात ‘नाफेड’मार्फत कांदा खरेदी; शेतकऱ्यांना काहीसा दिलासा