ट्रम्प यांचे व्हिक्टीम कार्ड
अनिल टाकळकर, वॉशिंग्टन डी सी
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातील ‘हश मनी’ खटल्यात कायद्यापुढे सर्व समान आहेत, हे अमेरिकन व्यवस्थेतील तत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले. निवडणुकीच्या तोंडावर डेमोक्रॅटिक पक्ष आणि त्याचे अध्यक्षीय उमेदवार जो बायडेन यांच्या हातात ट्रम्पविरोधी प्रचार करायला आयते कोलित मिळाले; आता बायडेन यांचे पुत्र हंटर यांच्याविरोधातही एक खटला सुरू असून, ते त्यात दोषी ठरले तर ट्रम्प समर्थकही प्रचारातील हत्यार म्हणून त्याचा वापर करणार, हे उघड आहे.
‘नो वन इज अटॅकिंग अमेरिका, अमेरिका इज अटॅकिंग इटसेल्फ’ अशी जी प्रतिक्रिया डोनाल्ड ट्रम्प यांना ‘हश मनी’ या गाजलेल्या खटल्यात झालेल्या शिक्षेनंतर एका राजकीय विश्लेषकाने दिली, ती अतिशय बोलकी म्हणावी लागेल. कारण, या महासत्तेतील परस्परविरोधी राजकीय शक्तीच या देशाच्या व्यापक हिताला नख लावत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर जे काही घडत आहे, ते याचीच साक्ष ठरते आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना ‘हश मनी’ खटल्यात दोषी ठरविले गेल्यानंतर डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पक्षात आरोप-प्रत्यारोपाचे युद्ध सुरू आहे, ते याचे नेमके उदाहरण आहे. अमेरिकेच्या राजकीय इतिहासामध्ये एखाद्या माजी अध्यक्षाला एका फौजदारी खटल्यात तब्बल 34 आरोपांवरून दोषी ठरविले जाणे हे इथे प्रथमच घडले आहे.
अमेरिकेच्या घटनाकारांनी याची कधी कल्पनाही केलेली नसल्याने यासंबंधीचे काही प्रश्न अनुत्तरित आहेत. शिक्षा झालेला उमेदवार अध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकतो का, तो मतदान करू शकतो का, तुरुंगात असताना निवडून आल्यास तुरुंगातून अध्यक्षपदाची सूत्रे तो हाती घेऊ शकतो का, असे किती तरी प्रश्न आता निर्माण झाले आहेत. मात्र, कोणत्याही स्थितीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार असलेले ट्रम्प यांना निवडणूक लढविण्यापासून व प्रचार करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. अमेरिकन घटनेमध्ये गुन्ह्यात दोषी ठरलेल्या उमेदवाराला अध्यक्षपदाच्या उमेदवारीतून बाद करण्याची कसलीही तरतूद नाही. तो फक्त 35 वर्षांपेक्षा अधिक, अमेरिकेत जन्मलेला (नॅचरल बॉर्न) व किमान 14 वर्षे तिथे वास्तव्य असलेला हवा. काही अमेरिकन राज्यांमध्ये स्थानिक अथवा राज्यपातळीवरील पदांसाठी शिक्षा झालेल्यांना अपात्र ठरविले जाते; पण केंद्रीय पातळीवर अध्यक्षीयपदासह इतर कोणत्याही पदासाठी ही अट लागू नाही.
अमेरिकन घटनेच्या 14 व्या दुरुस्तीच्या तिसर्या कलमानुसार, एखाद्या व्यक्तीने घटनापालनाची शपथ घेतल्यानंतर सरकारी यंत्रणेविरुद्ध उठाव वा बंड केल्यास त्याला नागरी तसेच लष्करी क्षेत्रातील कोणत्याही पदावर राहता येत नाही. ट्रम्प यांनी 2020 च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आपल्या समर्थकांना चिथावण्या देऊन त्यांच्याकरवी 6 जानेवारी 2021 रोजी अमेरिकच्या कॅपिटल हिलवर हल्ला केला होता, असा आरोप आहे. त्यामुळे ट्रम्प कोणत्याही पदास उभे राहण्यासाठी अपात्र ठरतात, असा दावा करण्यात आला होता. कोलारॅडोच्या सुप्रीम कोर्टाने त्याबद्दल त्यांना अपात्रही ठरविले होते. अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने मात्र राज्यांना असे करण्याचा आणि बॅलटवरून त्यांचे नाव वगळण्याचा अधिकार नसल्याचा निकाल दिला होता. फक्त अमेरिकन काँग्रेसच या कायदेशीर तरतुदीची अंमलबजावणी करू शकते, असे या कोर्टाने स्पष्ट केले होते.
ट्रम्प मतदान करू शकतील का, याबाबत उलटसुलट मतमतांतरे आहेत. प्रत्येक राज्यात वेगवेगळे नियम असल्याने या प्रश्नाचे नेमके उत्तर देणे अवघड आहे.
ट्रम्प यांचे वय (77) लक्षात घेता आणि त्यांनी यापूर्वी अशाप्रकारचे फौजदारी स्वरूपाचे गुन्हे केलेले नसल्याने त्यांना कारावासाची शिक्षा होण्याची शक्यता कमी आहे. कदाचित प्रोबेशनचा पर्याय स्वीकारला जाऊ शकतो. मात्र, तुरुंगात गेल्यास ते स्वतः उमेदवार असले तरी मतदान करू शकणार नाहीत. तथापि, एकंदरच अमेरिका गुन्हेगारांच्या बाबतीत बरीच उदार आहे. उदा., अमेरिकेच्या 1920 च्या अध्यक्षीय निवडणुकीत युजिन व्ही. डेब्ज हे सोशालिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून तुरुंगातून निवडणूक लढवीत होते. ही निवडणूक वॉरन हार्डिंग या रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवाराने जिंकली. मात्र, तुरुंगात असतानाही डेब्ज यांनी 3.4 टक्के मते मिळविली होती. ‘हश मनी’ प्रकरणात दोषी ठरल्यानंतर ट्रम्प त्याविरुद्ध अपील करणार, हे निश्चित. त्यामुळे ही प्रक्रिया दीर्घकाळ चालेल. ट्रम्प यांच्याविरुद्ध आणखी तीन खटले प्रलंबित आहेत. त्यापैकी पहिले दोन गंभीर स्वरूपाचे आहेत. समर्थकांकरवी कॅपिटल हिलवर हल्ला घडवून आणणे आणि जॉर्जिया राज्यातील मतमोजणी प्रक्रियेत ढवळाढवळ करणे, अशा आरोपांचे ते खटले आहेत. तिसरा खटला गोपनीय दस्तावेजांच्या अवैध हाताळणीशी निगडित आहे. हे खटले मात्र अद्याप सुनावणीला आलेले नाहीत. निवडणुकीपूर्वी ते येण्याची शक्यता कमी आहे.
एकीकडे ट्रम्प या खटल्यात अडकले असले, तरी दुसरीकडे बायडेनही त्यांचे पुत्र हंटर यांच्या खटल्यामुळे काहीसे अडचणीत येऊ शकतात. कायद्यापुढे सर्व समान असल्याचे सूत्र अमेरिकेने स्वीकारले असल्यानेच उच्चपदस्थांनाही त्याच्यापासून सुटका मिळत नाही, एका गन प्रकरणात आपल्याला अमली पदार्थाचे व्यसन नव्हते, अशी खोटी माहिती दिल्याचा आरोप असलेला खटला हंटर यांच्याविरोधात सुरू आहे, दुसरा खटला कर कायद्याच्या उल्लंघनाशी निगडित आहे. त्यात ते दोषी ठरल्यास त्याचे भांडवल ट्रम्प समर्थक करणार, हेही स्पष्ट दिसते.
29 जून रोजी बायडेन आणि ट्रम्प यांच्यात ‘सीएनएन’तर्फे होणार्या जाहीर वादविवादात दोन्हीही उमेदवारांना आपापली भूमिका मांडत असताना परस्परांना फैलावर घेण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यात असे विषय ओघाने येणारच. अर्थात, या वादविवादातूनही काही काठावरचे मतदार आपले मत बदलण्याची शक्यता आहे. ‘हश मनी’ खटल्यामध्ये पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनियल्स. तसेच ट्रम्प यांचे एकेकाळचे विश्वासू वकील व नंतर त्यांच्याविरोधात गेलेले मायकेल कोहेन यांची साक्ष सर्वात महत्त्वाची ठरली. ट्रम्प यांनी या खटल्यामध्ये साक्षीदार, न्यायालयीन कर्मचारी आणि त्यांचे नातेवाईक यांच्यावर न्यायालयाने मनाई केलेली असतानाही अनिर्बंध टीका केली. याप्रकरणी आदेशांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांना वेळोवेळी दंडही ठोठवण्यात आला होता. मायकेल कोहेन नीच आहेत, असेही ते म्हणाले होते. 2016 च्या निवडणुकीच्या तोंडावर स्टॉर्मी डॅनियल्स हिने आपल्या कथित लैंगिक संबंधांची जाहीर वाच्यता करू नये, यासाठी ट्रम्प यांनी कोहेन यांच्यामार्फत तिला 1 लाख 30 हजार डॉलर दिल्याचा आरोप करण्यात आला होता. निवडणुकीत हे सर्व उघड होणे, हे आपल्याला परवडणारे नाही, हे लक्षात आल्यानेच हा ‘कॅश अँड किल’ (द स्टोरी) चा हा छुपा व्यवहार झाला. हे पैसे आपल्याला ट्रम्प यांनी द्यायला सांगितले होते, असे कोहेन यांनी न्यायालयासमोर स्पष्ट केले.
2006 मध्ये ट्रम्प यांच्याशी आपले शारीरिक संबंध होते, असा खळबळजनक आरोप खुद्द स्टॉर्मीने केला होता. इतकेच नव्हे, तर मॉडेल आणि अभिनेत्री असलेल्या कॅरेन मॅकडोलचे 2006 मध्ये ट्रम्प यांच्याशी अनैतिक संबंध होते. त्याबद्दल तिने वाच्यता करू नये, यासाठी तिलाही दीड लाख डॉलर दिल्याचा आरोप करण्यात आला होता. हे सर्व आरोप ट्रम्प यांनी नाकारले आहेत. या ‘हश मनी’ प्रकरणावरून ट्रम्प यांनी न्यायाधीश भ्रष्ट असून, हे ‘कांगारू कोर्ट’ आहे, अशीही टीका केली होती. किंबहुना, हाच मुद्दा घेऊन या निवडणुकीत ट्रम्प उतरणार, हे स्पष्ट आहे. बायडेन आणि त्यांच्या प्रशासनाने न्यायव्यवस्थेला आपल्या दावणीला बांधले असून, त्यांनी आपल्याला या खटल्यात निष्कारण गोवल्याचा प्रचार त्यांनी सुरू केला आहे. इतकेच नव्हे, तर रिपब्लिकन पक्षाचे त्यांचे सहकारीदेखील त्यांचीच री ओढताना दिसतात. आता आपले हे व्हिक्टीम कार्डचे भांडवल करण्यात ट्रम्प कितपत यशस्वी होणार, याविषयी उत्सुकता आहे. या खटल्यामध्ये 12 ज्युरींनी सर्व आरोपांवरून एकमताने ट्रम्प यांना दोषी ठरविल्यानंतर 24 तासांत 53 दशलक्ष डॉलरचा निधी ते उभारू शकले, त्यावरून त्यांना मानणारा, त्यांच्याशी निष्ठा असलेला पैसेवाला मतदार खूप मोठा असल्याचे दिसते. खटल्याचा निकाल काहीही लागो, आम्ही ट्रम्प यांच्याच बाजूने उभे राहणार, असे म्हणणारेही कट्टर रिपब्लिकनवादी मतदार बरेच आहेत.
आता अध्यक्षीय निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू झाला असला, तरी प्रत्यक्ष निवडणुकांसाठी पाच महिन्यांचा कालावधी आहे. ‘अ वीक इज लाँग टाईम इन पॉलिटिक्स’ असे म्हटले जाते, त्यामुळे या निवडणुकीत पुढे काय घडणार, याविषयी आता तर्कवितर्क करणे अशक्य आहे. त्यामुळे अनिश्चिततेचे वातावरण आहे.
बायडेन सध्या 81 वर्षांचे आहेत. ते निवडून आल्यास त्यांना वयाच्या 85 व्या वर्षापर्यंत काम करावे लागणार आहे. त्यासाठी लागणारी शारीरिक क्षमता त्यांच्यात टिकून राहील का, अशाही शंका उपस्थित केल्या जात आहेत. वयोमानामुळे बायडेन यांना परिषदांमध्ये बोलताना अनेकदा महत्त्वाच्या मुद्द्यांचे विस्मरण होते, तर काही वेळा त्यांना डुलकीही लागते. ट्रम्प यांची अवस्थाही त्यांच्यापेक्षा फार चांगली आहे असे मानण्याचे कारण नाही. त्यांनीही बोलताना अनेकवेळा चुकीचे संदर्भ दिले आहेत. त्याची भरपूर चर्चा येथील माध्यमांतून होताना दिसते.
ट्रम्प यांची उमेदवारी निश्चित
ट्रम्प यांच्या उमेदवारीवर रिपब्लिकन पक्षाच्या 15 जुलै रोजी होणार्या राष्ट्रीय अधिवेशनात शिक्कामोर्तब होणार आहे. तत्पूर्वी, चारच दिवस आधी न्यूयॉर्क सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती युवान मर्चन ‘हश मनी’प्रकरणी दोषी ठरल्याबद्दल त्यांना शिक्षा सुनावणार आहेत. त्यांना समजा तुरुंगवासाची शिक्षा झाली, तरीही तेच उमेदवार राहणार का? अशीही काहींना शंका आहे. परंतु, या पक्षाच्या घटनेनुसार ऐनवेळी दुसरा कोणताही उमेदवार आणला जाऊ शकत नाही. त्यामुळे या अधिवेशनामध्ये त्यांच्या नावाची निश्चिती होणार, हे नि:संशय. ट्रम्प किंवा त्यांचे सहकारी बायडेन सरकार सूडबुद्धीने वागत असल्याचा प्रचार जोमात करतील आणि आपण ‘राजकीय कैदी’ झालो असून, ‘निरपराध’ आहोत, असा दावा पुन्हा करतील, यात शंका नाही.