बापचं बनला वैरी: तीन वर्षाच्या चिमुरडीचा डोक्यात काठी घालून खून

बापचं बनला वैरी: तीन वर्षाच्या चिमुरडीचा डोक्यात काठी घालून खून

धुळे; Bharat Live News Media वृत्तसेवा : दारूच्या नशेत तीन वर्षाच्या मुलीच्या डोक्यात काठी मारून तिचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मद्यपी बापाने मयत मुलीचा मृतदेह वन विभागाच्या जमिनीत पुरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. शिरपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांनी प्राथमिक तपासातच हा सर्व प्रकार उघडकीस आणला आहे. मद्यपी तरुणाच्या विरोधात शिरपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरपूर तालुक्यातील नांदरडीवाडी गावात हा प्रकार घडला. या गावात राहणारा अनिल गुलाबसिंग पावरा (वय 28) याला मद्याचे व्यसन आहे. तो गावातच त्याच्या पत्नी, तीन वर्षे वयाच्या मुलगी पूजा यांच्या बरोबर राहतो. काही दिवसांपूर्वी पती-पत्नीमध्ये दिवसांपासून वाद झाला होता. यामुळे पत्नी नातेवाईकांच्या घरी रागाने निघून गेली होती. त्यामुळे अनिल आणि पूजा हे दोघेच घरी होते.
मात्र गुरुवारपासून (दि.6) त्याची मुलगी घरी नसल्यामुळे गावातील काही लोकांनी तसेच अनिल याच्या नातेवाईकांनी त्याची मुलगी पूजा कुठे आहे अशी अनिलला विचारणा केली. यावेळी त्याने मुलगी ही नातेवाईकाकडे गेल्याची खोटी माहिती दिली. संबंधित व्यक्तींनी अनिल याने दिलेल्या माहितीची खातरजमा केली असता. तो खोटे बोलत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे हा प्रकार शिरपूर पोलिसांपर्यंत पोहोचला. शिरपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांनी तातडीने नांदरडी गाव गाठून अनिल याची कसून विचारपूस सुरू केली. यावेळी भयानक प्रकार समोर आला. अनिल हा गुरुवारी मद्याच्या नशेत होता.
यावेळी पूजाही रडत असल्याने त्याने रागाने तिच्या डोक्यात लाकडी काठी मारली. त्यानंतर तो झोपी गेला. सकाळी उठल्यानंतर त्याला पूजा ही निपचित पडली असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याने पूजाचा मृतदेह गावाजवळील वन विभागाच्या जमिनीत पुरून पुरावा नष्ट केला. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये खुनाचा गुन्हा निष्पन्न झाला. आता गावातील समाजसेवक पंकज पावरा यांनी दिलेल्या तक्रारीवरून अनिल गुलाबसिंग पावरा याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.