कोल्हापूर, इचलकरंजी मनपामुळे विधानसभा निवडणुकीत चुरस
कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून पाटील-महाडिक संघर्ष सुरू आहे. दोन वेळा पाटील यांनी, तर एकदा महाडिक यांनी येथून बाजी मारली आहे. आता दक्षिणेतला हा पाटील-महाडिक संघर्ष कोल्हापूर उत्तर मतदारसंघातही होण्याची शक्यता आहे. भाजपने कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक लढवत येथे चांगली मते घेतली. त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जोरदार दावेदारी सुरू आहे. कोल्हापूर उत्तरमधून महाडिक घराण्यातून भाजपकडून उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू असल्याने पाटील-महाडिक असा जोरदार संघर्ष येथे पाहायला मिळेल.
महापालिकेच्या राजकारणाचा संदर्भ याला आहेच, त्याचबरोबर आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीचाही संदर्भ असल्याने याला वेगळे महत्त्व आले आहे. त्याचबरोबर इचलकरंजीला महापालिका झाली आहे. त्याची पहिली निवडणूक व्हायची आहे. महापालिकेच्या निवडणुका व्हायच्या तेव्हा होतील; मात्र त्यावर वर्चस्व मिळविण्यासाठी विधानसभेची झुंज कडवी असेल.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला 14 हजार 528 चे मताधिक्य मिळाले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत याच मतदारसंघाने शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांना 27 हजार 655 चे मताधिक्य दिले होते. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे चंद्रकांत जाधव यांनी 15 हजार 191 मताधिक्याने विजय मिळविला होता. त्यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी जयश्री जाधव यांनी तब्बल 19 हजार 307 मताधिक्याने या मतदारसंघातून विजय मिळविला होता. यापूर्वी 1980 साली काँग्रेसचे लालासाहेब यादव हे विजयी झाले होते. हा काँग्रेसचा पहिला विजय होता. त्यानंतर 2004 साली काँग्रेसचे मालोजीराजे विजयी झाले होते. मालोजीराजे यांच्या नगरसेवकांचा महापालिकेत गट होता.
कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक अतिशय चुरशीने झाली. काँग्रेस व भाजपसाठी ही जागा अतिशय प्रतिष्ठेची होती. या निवडणुकीत जयश्री जाधव यांना 97 हजार 332, तर भाजपचे सत्यजित कदम यांना 78 हजार 25 मते मिळाली होती. 2014 ला भाजपचे महेश जाधव यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. त्यांना 40 हजार 104 मते मिळाली होती. याचवर्षी सत्यजित कदम यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढविली होती, तेव्हा त्यांना 47 हजार 135 मते मिळाली होती. पोटनिवडणुकीत काँग्रेस तसेच भाजपची मते वाढली आहेत.
सतेज पाटील यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झाल्यावर जिल्ह्यात काँग्रेस आमदारांची संख्या शून्यावरून 6 पर्यंत नेली आहे. पाटील हे आता विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आहेत, तर धनंजय महाडिक हे भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत. त्यामुळे राजकीय पातळीवर तुल्यबळ लढतीसाठी सज्ज झाले आहेत. जिल्ह्यात भाजपचे दोन आमदार होते; पण सध्या एकही अमादार भाजपकडे नाही, तर दोन आमदार भाजपचे सहयोगी आहेत. या राजकीय पार्श्वभूमीवर आता कोल्हापूर दक्षिणबरोबरच कोल्हापूर उत्तरची जागा भाजपला मिळाली पाहिजे, अशी मागणी भाजपकडून केली जाणार आहे. त्यासाठी महाडिक घराण्यातील उमेदवार दिला जाण्याची चर्चा आहे.
पाटील-महाडिक हा राजकीय संघर्ष दक्षिणबरोबरच उत्तरेतही पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्याला कारण आहे ते कोेल्हापूर महापालिकेची निवडणूक. कोल्हापूर महापालिकेवरील वर्चस्वासाठी पाटील-महाडिक असा राजकीय संघर्ष अटळ आहे.
कोल्हापूरप्रमाणेच इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकीसाठीचा संघर्ष लक्षात घेऊनच तिथेही विधानसभेची निवडणूक लढली जाणार आहे. इचलकरंजीला भाजपची उमेदवारी मिळविण्यासाठी भाजपचे विद्यमान सहयोगी आमदार प्रकाश आवाडे व माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्यात चुरस असेल. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून बंडखोरीची घोषणा प्रकाश आवाडे यांनी केली होती; मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी बंडखोरी केली नाही. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडून काय शब्द घेतला, त्यावर येथील चित्र अवलंबून असेल. तेथे महाविकास आघाडीही स्ट्राँग आहे. जिल्ह्यातील दहापैकी या तीन मतदारसंघांत महापालिकेच्या जोडण्या विचारात घेऊनच विधानसभेची निवडणूक लढली जाणार आहे.
2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ताराराणी पक्षाचे प्रकाश आवाडे विजयी झाले. त्यांनी भाजपचे सुरेश हाळवणकर यांचा पराभव केला. हाळवणकर यांनी दोन वेळा या मतदारसंघाचे विधानसभेला प्रतिनिधित्व केले आहे. आवाडे यांनी त्यांचा 49 हजार 810 मतांनी पराभव केला. आवाडे यांना 1 लाख 16 हजार 886, तर हाळवणकर यांना 67 हजार 76 मते मिळाली होती.
कोल्हापूर महापालिका विसर्जित झाली त्यावेळी पुढीलप्रमाणे बलाबल होते
* महापालिकेचे प्रभाग 81, सत्तेत महाविकास आघाडी
* काँग्रेस 30, राष्ट्रवादी काँग्रेस 14, शिवसेना 4
* विरोधी बाजूचे सदस्य- भाजप 14, ताराराणी आघाडी 19
* 15 नोव्हेंबर 2020 रोजी महापालिकेचे सभागृह बरखास्त
* तेव्हापासून प्रशासक राजवट
इचलकरंजी नगरपालिका संमिश्र आघाडीची सत्ता
* लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी
* विसर्जित नगरपालिकेतील सदस्यसंख्या पुढीलप्रमाणे- तत्कालीन सत्ताधारी भाजप 14, मँचेस्टर आघाडी 12, जांभळे गट
* विरोधी आवाडे गट 20
* नंतरच्या काळात सर्वच सदस्य एकत्र
* 30 डिसेंबर 2022 रोजी नगरपालिकेची शेवटची सभा, याच सभेत महापालिका स्थापनेचा ठराव
* इचलकरंजी महापालिकेची स्थापना; मात्र अद्याप प्रभाग रचना नाही.