यवतमाळ : उसनवारी पैशाच्या वादातून तरुणाचा खून
यवतमाळ; Bharat Live News Media वृत्तसेवा : यवतमाळमध्ये उसनवारी पैशाच्या कारणावरून एका ३८ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने भोसकून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. राळेगाव शहरातील भर वर्दळीच्या बसस्थानकासमोर बुधवारी (दि.८) ही घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली. छोटू ऊर्फ नितेश ओंकार (वय ३८) असे या तरूणाचे नाव असून याप्रकरणी रवी ऊर्फ भोला महाजन व मयूर इंगळे या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला घटनेनंतर आरोपी पसार झाले असून पोलिस पथकाकडून त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, राळेगाव येथील नितेश ओंकार हा राळेगाव येथे टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करत होता. बुधवारी रात्री नऊच्या सुमारास बस स्टँड समोरील एका गादी सेंटर दुकानासमोर बसला असताना उसनवारीच्या पैशाच्या कारणावरून त्याच्यावर धारदार शस्त्राने मानेवर व पोटावर वार करण्यात आले. तसेच लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. बुधवारी रात्री नऊच्या सुमारास शहरातील बसस्थानकासमोर घडलेल्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. घटनेनंतर आरोपी पसार झाले. घटनेची माहिती मिळताच राळेगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण जाधव हे पोलिस पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. हल्ल्यानंतर छोटू ऊर्फ नितेश ओंकार हा रक्ताच्या थारोळ्यात घटनास्थळी पडून होता. गंभीर अवस्थेतील नितेश यास तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे हलविण्यात आले. मात्र, त्याची स्थिती अत्यंत गंभीर असल्याने त्याला तेथून जिल्हा रुग्णालय यवतमाळ येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. मात्र, यवतमाळ येथे नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालय येथे पाठविण्यात आला आहे.
याप्रकरणी मृत नितेशचा भाऊ विशाल ओंकार याने पोलिसात फिर्याद दिली. पंधरा दिवसापूर्वी फोन करून भोला उर्फ रवी महाजन हा उसनवारीने घेतलेले पैसे परत मागण्या करता तगादा लावत होता. तसेच त्याने मारण्याची धमकी दिल्याचे मृत छोटू ने सांगितले होते, असे विशालने या तक्रारीत म्हटले आहे. त्यावरुन रवी ऊर्फ भोला महाजन आणी त्याचा साथीदार मयूर इंगळे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक विशाल बोरकर हे करीत आहे.
हेही वाचा :
हैदराबादमधील ब्लिंकिट गोदामावर छापा; मुदत संपलेले खाद्यपदार्थ जप्त
Delhi News : नकली आधार कार्डवर संसदेत घुसण्याचा प्रयत्न; तिघांना अटक
बीड: केज येथे ३ हजारांची लाच घेताना मुख्याध्यापक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात