अमेरिकेला हरवण्यासाठी पाकिस्तानी गोलंदाजांचा रडीचा डाव?
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अमेरिका संघाने टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करताना पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये हरवून खळबळ उडवून दिली. पाकिस्तानचे खेळाडू कागदावरच वाघ असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. अमेरिकेसारख्या दुबळ्या संघा विरूद्ध खेळताना पाकिस्तानला घाम गाळावा लागला. आता या सामन्यावरून एक नवा वाद निर्माण झाला आहे. पाकिस्तानी गोलंदाज हॅरिस रौफ याच्यावर चेंडूशी छेडछाड केल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे.
पाकिस्तानने केली होती चेंडू बदलण्याची मागणी
अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील T20 विश्वचषक सामन्यात अमेरिकन संघाच्या डावादरम्यान पाकिस्तानने 12 षटकांनंतर चेंडू बदलण्याची मागणी केली होती. त्यावेळी अमेरिकेची धावसंख्या एका विकेटवर 94 धावा होती. चेंडू बदलल्यानंतर पुढच्याच षटकात अँड्रियास घोऊस आणि मोनांक पटेल यांच्यातील 68 धावांची भागीदारी फोडण्यात पाकिस्तानला यश आले. रौफने घौसची विकेट घेत ही भागीदारी संपुष्टात आणली. घौस बाद झाल्यानंतर पुढच्याच षटकात मोहम्मद अमीरने अमेरिकेच्या कर्णधाराला तंबूत धाडले.
अमेरिकेच्या दिग्गज क्रिकेटरने केला हारिस रौफवर आरोप
अमेरिकेचा दिग्गज क्रिकेटर रस्टी थेरॉनने सोशल मीडियावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) टॅग करत वेगवान गोलंदाज हारिस रौफवर चेंडूशी छेडछाड केल्याचा गंभीर आरोप केला आहे. रस्टी थेरॉनने याबाबत एक्सवर एक पोस्टही केली आहे की, हरिस रौफने नवीन चेंडूशी नखाने छेडछाड केली. पुढे त्याने लिहले आहे की, दोन षटकांपूर्वी बदललेला चेंडू रिव्हर्स कसा काय होऊ शकतो? आयसीसी पाकिस्तानने बदललेला चेंडू स्क्रॅच केला नाही, असे भासवत आहे काय? हॅरिस रौफने नखाने चेंडूसोबत केलेल्या छेडछाडीचे पुरावे तुम्हाला चेंडूवर पहायला मिळतील. या घटनेनंतर अद्यापही अमेरिकन संघाकडून रौफविरूद्ध अधिकृत तक्रार करण्यात आलेली नाही.
सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानचा पराभव
सामन्यात टाय झाल्याने सामना सुपर ओव्हरमध्ये खेळवण्यात आला. सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना अमेरिकेने 18 धावा केल्या. पाकिस्ताच्या फलंदाजांना हे आव्हान पार करता आले नाही. त्यांना 1 बाद 13 धावा करता आल्या. अमेरिकेकडून सौरभ नेत्रावळकरने अफलातून गोलंदाजी करताना पाकिस्तानी फलंदाजांना जखडून ठेवले. या उलट पाकिस्तानकडून मोहम्मद आमीरने 3 वाईड बॉल टाकत त्यावर 4 एक्स्ट्रा धावा दिल्या. पाकिस्तानला विजयासाठी 19 धावांचे आव्हान मिळाले होते. अमेरिकाकडून नेत्रावळकर याने गोलंदाजी केली. नेत्रावळकरने पहिला चेंडू निर्धाव फेकला. दुसऱ्या चेंडूवर इफ्तिखार अहमद याने चौकार ठोकला. पुढचा चेंडू नेत्रावळकर यानं वाईड फेकला. पण पुढच्याच चेंडूवर इफ्तिखार बाद झाला. नेत्रावलकार याने वाइड फेकला. त्यानंतर पुढील चेंडूवर पाकिस्तानला लेग बायचा चौकार मिळाला. पाच्या चेंडूवर दोन धावा आल्या. अखेरच्या चेंडूवर फक्त एकच धाव मिळाली. सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानला अवघ्या 13 धावांवर रोखत अमेरिकेने सामन्यात शानदार विजय मिळवला.