डुप्लिकेट भगरे सर अखेर प्रकटले, नेमकं काय आहे प्रकरण?

डुप्लिकेट भगरे सर अखेर प्रकटले, नेमकं काय आहे प्रकरण?

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा- दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून लाखांवर मते घेणारे अपक्ष उमेदवार बाबू सदू भगरे हे अखेर २४ तासानंतर गुरुवारी (दि.६) समाेर आले. मी सुखरुप असून कामानिमित्त बाहेरगावी गेल्याने घरी यायला वेळ लागल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. दरम्यान, भगरे अचानक गायब झाल्याने त्यांचे कुटूंबिय चिंतेत होते. तर पोलिसही त्यांचा शोध घेत होते.
कांद्याच्या प्रश्नावरून गाजलेल्या दिंडाेरी मतदारसंघात राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांनी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा तब्बल १ लाख १३ हजार ३९९ मतांनी पराभव केला. मात्र, पवारांच्या पराभवापेक्षा मतदारसंघात डुप्लिकेट बाबू सदू भगरे या अपक्ष ऊमेदवाराची चर्चा अधिक रंगत आहे. कारण अपक्ष भगरे यांनी १ लाख ३ हजार ६३२ मते घेतल्याने साऱ्यांच्याच भुवयां ऊंचावल्या. मात्र, हेच भगरे बुधवारपासून गायब असल्याने सर्वत्र चिंतेच वातावरण होते.
बाबू भगरे हे गुरूवारी (दि.६) प्रसारमाध्यमांसमोर आले. यावेळी कामानिमित्त आपण बाहेरगावी असल्याचे सांगताना येण्यासाठी ऊशिर झाल्याचा खुलासा त्यांनी केला. आपण मासेमारी व मोल मजूरी करत असून जवळ मोबाईलदेखील वापरत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भगरे यांच्या परत येण्याने कुटूंबाचा जीव भांड्यात पडला आहे. 
त्यामुळे उडाला गोंधळ

दरम्यान, दिंडोरीचे नुतन खासदार भगरे हे पेशाने सर आहेत.
तर निवडणूकीत अपक्ष अर्ज भरणाऱ्या बाबू भगरे यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जात नावापुढे सर लावले.
त्यातच अपक्ष भगरेंना पिपाणी हे निवडणूक चिन्ह मिळाले.
त्यामुळे भगरे यांच्या नावात तसेच चिन्हातही साधर्म्य दिसून आल्याने निवडणूकीत अनेक मतदारांचा गोंधळ उडाला.

बाबू भगरेंची पार्श्वभूमी
नाशिक तालूक्यातील एकलहरेचे रहिवासी असलेले बाबू भगरे हे तिसरी पास असल्याची माहिती मिळते आहे. भगरे हे मोलमजुरी आणि मासेमारी करत असले तरी निवडणूकीत त्यांच्या नावापुढे सर असा उल्लेख होता. बाबू भगरे यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याचे समजते. मात्र, निवडणूकीत त्यांनी घेतलेल्या लाखभर मतांमुळे राजकीय वर्तुळात ते चर्चेचा विषय ठरले आहेत.
खा. भगरेंची घेणार भेट
लोकसभेत लाखाच्यावर मते घेणाऱ्या बाबू भगरे यांनी प्रचारासाठी आपण गेला नव्हतो. तर प्रचारा साठी माणसं सोडलेली होती असा दावा केला. तसेच आदिवासी व शेतकऱ्यांची कामे करण्यासाठी निवडणूक लढवल्याचे स्पष्ट केले आहे. नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे यांना भेटून काम करायला सांगणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोकसभेची पुढील निवडणूक लढणार का या प्रश्ना वर पुढच्या निवडणुकीचे पुढे बघू, तोपर्यंत जगतो मरतो माहिती नाही, अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली.
हेही वाचा –

RBI Repo Rate: ब्रेकिंग | RBI चा रेपो रेट 6.5 टक्केवर कायम, लोकसभा निवडणुकीनंतर पहिले RBI धोरण जाहीर
Sunita Williams : अंतराळात पोहोचल्‍यावर सुनीता विल्‍यम्‍स यांनी आनंदाने मारल्‍या उड्या; सहकाऱ्यांची घेतली गळाभेट
Nashik Teachers Constituency | ‘शिक्षक’साठी नामनिर्देशनची आज अंतिम मुदत, आता पर्यंत किती उमेदवारांचे अर्ज ?