USA vs PAK : नवख्या अमेरिकेने केला सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानचा धक्कादायक पराभव

USA vs PAK : नवख्या अमेरिकेने केला सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानचा धक्कादायक पराभव

न्यूयॉर्क, वृत्तसंस्था : पहिला वहिला वर्ल्डकप खेळणार्‍या अमेरिका संघाने जबरदस्त कामगिरी करताना 2010 चा विश्वविजेता पाकिस्तान संघाला सुपर ओव्हरमध्ये हरवून खळबळ उडवून दिली. सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेने 18 धावा केल्या. पाकिस्ताच्या फलंदाजांना हे आव्हान पार करता आले नाही. त्यांना 1 बाद 13 धावा करता आल्या. अमेरिकेकडून सौरभ नेत्रावळकरने अफलातून गोलंदाजी करताना पाकिस्तानी फलंदाजांना जखडून ठेवले. या उलट पाकिस्तानकडून मोहम्मद आमीरने 3 वाईड बॉल टाकले आणि त्यावर 4 एक्स्ट्रा धावा दिल्या.
न्यूयॉर्कच्या नासाऊ स्टेडियमवर पाकिस्तान संघाला ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात अमेरिकेने विजयासाठी संघर्ष करायला लावला. यजमान अमेरिकेने सर्वोत्तम सांघिक कामगिरी करून पाकिस्तानवर संपूर्ण सामन्यात वर्चस्व गाजवले. पाकिस्तानच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्यामुळे अमेरिकेचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी शेवटच्या षटकापर्यंत कडवी टक्कर दिली. जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांची फौज असलेल्या पाकिस्तानला यजमानांनी आरसा दाखवला. पण, पाकिस्तानच्या गोलंदाजांनी शेवटच्या तीन षटकांत सामना फिरवला होता आणि शेवटच्या तीन चेंडूत एक षटकार व चौकारसह 11 धावा मिळाल्याने सामना बरोबरीत सुटला आणि सुपर ओव्हरमध्ये गेला.
तत्पूर्वी, नोस्तुश केंजिगे ( 2-30), मुळचा मुंबईचा सौरभ नेत्रावळकर ( 2-18), अली खान ( 1-30) व जसदीप सिंग (1-37) यांनी पाकिस्तानच्या फलंदाजांची कोंडी केली. 3 बाद 26 अशा अवस्थेतून पाकिस्तानला बाबर आजम व शादाब खान यांनी सावरले. त्यांनी 48 चेंडूंत 72 धावांची भागीदारी केली. शादाब 25 चेंडूंत 1 चौकार व 3 षटकारांसह 40 धावांवर बाद झाला. बाबरने 43 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकारांसह 44 धावा केल्या. इफ्तिखार अहमदच्या 18 आणि शाहीन शाह आफ्रिदीच्या नाबाद 22 धावांमुळे पाकिस्तान 7 बाद 159 धावांपर्यंत कसाबसा पोहोचला.