मार्कंडा येथे धान्य खरेदीमध्ये 6 कोटींचा घोटाळा करणाऱ्या अधिकाऱ्यांना अटक
गडचिरोली, Bharat Live News Media वृत्तसेवा : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने करण्यात येणाऱ्या धान्य खरेदीत ६ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी (दि.6) गडचिरोली महामंडळाचे येथील तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक यांच्यासह तत्कालिन कनिष्ठ सहाय्यकास अटक केली आहे. न्यायालयाने या दोघांनाही 10 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. गजानन रमेश कोटलावार (वय. 36) आणि व्यंकटी अंकलू बुर्ले (वय. 46) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. कोटलावार हा प्रादेशिक व्यवस्थापक तर बुर्ले हा मार्कंडा(कं) येथील खरेदी केंद्राचा केंद्रप्रमुख आणि कनिष्ठ सहाय्यक होता.
किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी पिकवलेले धान्य आदिवासी विकास महामंडळामार्फत विविध खरेदी केंद्रांवर दिले जाते. या धान्यांचे जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिलेल्या राईस मिलर्सना बँक गॅरंटीच्या प्रमाणात भरडाईसाठी वितरण केले जाते. वितरित केलेल्या धानाचे आदेश मिलर्स आणि खरेदी केंद्रांचे केंद्रपमुख यांच्या स्वाक्षरीने वजन पावत्यांसह उपप्रादेशिक कार्यालयास सादर केले जातात.
त्यानंतर मिलर्संनी उचल केलेल्या धानाची भरडाई करुन तयार केलेला तांदूळ जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या अधिनस्थ गोदामात जमा करतात. जमा केलेल्या तांदळाच्या स्वीकृत पावत्या मिलर्सद्वारे प्रादेशिक कार्यालयात जमा करण्यात येतात. परंतु, काही अधिकारी यात गैरप्रकार करुन आपले उखळ पांढरे करतात. असाच गैरप्रकार चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा(कं) येथील धान खरेदी केंद्रावर झाला.
पणन हंगाम 2022-23 मध्ये या केंद्रावर मोठी लुबाडणूक झाल्याच्या तक्रारीनंतर आदिवासी विकास महामंडळातर्फे चौकशी करण्यात आली. दरम्यान अनेक गंभीर बाबी उघडकीस आल्या. मार्कंडा केंद्रावर 59 हजार 947.60 क्विंटल धानाची खरेदी झाली होती. परंतु, प्रत्यक्षात 31 हजार 532.58 क्विंटल धान्य मिलर्सना देण्यात आले होते. मात्र, मिलर्सना दिलेल्या एकूण वितरण आदेशापैकी 28 हजार 415.02 क्विंटल धानाचा हिशोबात फेरफार झाली आहे. प्रतिक्विंटल 2040 रुपये याप्रमाणे 5 कोटी 79 लाख 66 हजार 640 रुपये किंमतीचा धान मिलर्सना प्राप्त झाला नाही.
शिवाय हे धान गोदामात देखील शिल्लक नव्हते. महामंडळातर्फे पुरविण्यात आलेल्या एकूण बारदाणापैकी 71 हजार 38 बारदाणे, प्रति बारदाण 32 रुपये 76 पैसे याप्रमाणे 23 लाख 27 हजार 204 रुपयांचा अपहार करण्यात आला. धान आणि बारदाण्याचा हा घोटाळा एकूण 6 कोटी 2 लाख 93 हजार 845 रुपये किमतीचा असल्याचे चौकशीअंती समोर आले आहे. याप्रकरणी व्यवस्थापक गजानन कोटलावार यांना 8 ऑगस्ट 2023 रोजी निलंबित करण्यात आले होते.
या अपहारामध्ये मार्कंडा(कं) खरेदी केंद्राचे तत्कालिन केंद्रप्रमुख व्यंकटी बुर्ले, विपणन निरीक्षक राकेश मडावी, प्रभारी उपप्रादेशिक व्यवस्थापक व्ही.ए.कुंभार, तत्कालिन प्रादेशिक व्यवस्थापक गजानन कोटलावार जबाबदार असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे प्रभारी प्रादेशिक व्यवस्थापकांनी आष्टी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर गजानन कोटलावार व व्यंकटी बुर्ले यांना अटक करण्यात आली. चामोर्शी न्यायालयाने त्यांना 15 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील तिसरा संशयित आरोपी राकेश सहदेव मडावी याला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणाची विचारपूस सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक राहुल आव्हाड, उपनिरीक्षक सरिता मरकाम, बालाजी सोनुने यांनी ही कारवाई केली.
हेही वाचा :
विरोधी पक्षनेतेपद स्वीकारण्याची राहुल गाधींना गळ; काॅंग्रेस खासदारांसह ठाकरे गटाची मागणी
Beed News : नाखलगावात वीज पडून बैलजोडीचा मृत्यू ; तर चिमुकलीला विजेचा चटका
केंद्रात एनडीए सरकार येताच, महाराष्ट्रात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार