लोकसभा निकालानंतर सत्तारांचे सूर बदलले; काँग्रेसमध्ये परतण्याची चर्चा

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील महायुतीच्या सरकारमधील मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते अब्दूल सत्तार यांनी गुरुवारी (दि.६) जालना लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांचा पराभव करणाऱ्या काँग्रेसच्या कल्याण काळे यांचा सत्कार केला. आपल्या काही कार्यकर्त्यांमध्ये दानवे यांच्याविषयी नाराजी होती आणि त्यांनी दानवे यांच्याविरोधात काम करुन कल्याण काळे यांना निवडून आणले, याची कबुलीही …

लोकसभा निकालानंतर सत्तारांचे सूर बदलले; काँग्रेसमध्ये परतण्याची चर्चा

छत्रपती संभाजीनगर, Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्यातील महायुतीच्या सरकारमधील मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते अब्दूल सत्तार यांनी गुरुवारी (दि.६) जालना लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांचा पराभव करणाऱ्या काँग्रेसच्या कल्याण काळे यांचा सत्कार केला. आपल्या काही कार्यकर्त्यांमध्ये दानवे यांच्याविषयी नाराजी होती आणि त्यांनी दानवे यांच्याविरोधात काम करुन कल्याण काळे यांना निवडून आणले, याची कबुलीही दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपला प्रासंगिक करार आहे, असेही मंत्री सत्तार म्हणाले. त्यामुळे सत्तार हे येत्या काळात पुन्हा कॉंग्रेसमध्ये परतण्याची चर्चा सुरू झाली आहे.
लोकसभा निवडणुकीत जालना मतदारसंघातून कल्याण काळे हे प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. त्यांनी महायुतीचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव केला. पराभव करणाऱ्या काळेंचा महायुतीचेच घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे मंत्री अब्दूल सत्तार यांनी सत्कार केला. काळे हे आपले मित्र आहेत, म्हणून आपण त्यांचा सत्कार केला, असे मंत्री सत्तार यांनी सांगितले.
त्यासोबत त्यांनी पत्रकारांशी बोलताना आगामी काळातील त्यांच्या वाटचालीचे संकेत दिले. अब्दूल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांच्यातील संघर्ष जुना आहे. परंतु दोघेही महायुतीत असल्याने यावेळी सत्तार यांनी दानवे यांचा प्रचारही केला. मात्र, आता सत्तार यांनी काळे यांचा सत्कार केल्याने तसेच काळे यांच्या विजयात आपल्या काही कार्यकर्त्यांचा वाटा असल्याचे विधान केल्याचे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अब्दूल सत्तार म्हणाले, राजकारणात कोणी कोणाचा शत्रू किंवा मित्र राहत नाही. यावेळची निवडणूक ही निवडणूक एका माणसाच्या हातात नव्हती. ती सर्वसामान्य माणसांनी हातात घेतली होती. दानवेंना कमी मते पडण्यात वेगवेगळी कारणे आहेत. कल्याण काळे यांच्या विजयाचे खरे शिल्पकार मनोज जरांगे पाटील हे आहेत. त्यांनी दानवेंबाबत तीव्र नाराजी दर्शविली होती. मी दानवे यांचा प्रचार केला. पण माझ्या काही कार्यकर्त्यांची नाराजी होती. लोकसभेत आमची मते घेता, विधानसभेत मदत करत नाहीत, अशी भावना कार्यकर्त्यांनी दानवे यांनाही बोलून दाखविली होती. माझ्या काही कार्यकर्त्यांनी काळेंना मदत केली हे मी कबूल करतो. परंतु, माझ्याबद्दल शंका-कुशंका करण्याचे कारण नाही, असेही मंत्री सत्तार म्हणाले.
एक लाख लोकांच्या उपस्थितीत टोपी काढणार
अब्दूल सत्तार यांनी पुर्वी काँग्रेसमध्ये असताना एक संकल्प केला होता. रावसाहेब दानवे यांना पाडल्यानंतरच डोक्यावरील टोपी काढू, असे त्यांनी जाहीर केले होते. तेव्हापासून ते डोक्यावर टोपी घालतात. आता दानवे यांचा पराभव झाल्याने ही टोपी काढणार असल्याचे सत्तार यांनी सांगितले. मी दानवे यांना पाडले नाही, परंतु योगायोगाने त्यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे आता मी टोपी काढणार आहे आणि या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रावसाहेब दानवे यांचा बोलाविण्यात येईल. हा कार्यक्रम सिल्लोड मध्ये किंवा संभाजीनगरात होईल. त्याला एक लाख लोक तरी हजर असतील, असेही मंत्री सत्तार म्हणाले.
कॉंग्रेसमध्ये परतण्याची चर्चा
लोकसभा निवडणुकीनंतर मंत्री अब्दूल सत्तार यांचे सूर अचानक बदलल्याने ते पुन्हा कॉंग्रेसमध्ये परतण्याची चर्चा सुरू झाली आहे. सत्तार हे पूर्वी काँग्रेसमध्येच होते. २०१९ साली ते विधानसभा निवडणुकीआधी शिवसेनेत आले होते. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदारांनी बंड केल्यानंतर ते शिंदेंसोबत गेले. त्यांना मंत्री करण्यात आले. आता ते पुन्हा कॉंग्रेसमध्ये परतू शकतात, अशी चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपला प्रासंगिक करार झालेला आहे, असे विधान त्यांनी पुन्हा केल्याने या चर्चेला पुष्टी मिळत आहे.
हेही वाचा :

मंत्रीपद वाटपावरून एनडीएमध्ये मतभेद, शपथविधी एक दिवस पुढे ढकलला
विरोधी पक्षनेतेपद स्वीकारण्याची राहुल गाधींना गळ; काॅंग्रेस खासदारांसह ठाकरे गटाची मागणी
Chhagan Bhujbal | महायुतीकडून उमेदवार देण्यात चूक झाली का? भुजबळ स्पष्टच बोलले