नाखलगावात वीज पडून बैलजोडीचा मृत्यू ; तर चिमुकलीला विजेचा चटका
दिंद्रुड, Bharat Live News Media वृत्तसेवा : नाखलगाव येथे गुरुवारी (दि.6) वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसात बैलजोडीवर वीज कोसळल्याने बैलांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सायंकाळी साडेचारच्या दरम्यान घडली. यामध्ये शेजारी खेळत असलेल्या सात वर्षांच्या मुलीला वीजेचा धक्का लागल्याने तिला किरकोळ इजा झाली आहे.
नाखलगाव येथील अल्पभूधारक शेतकरी बाबूराव किसन झोडगे हे शेतामध्ये काम करत होते. दरम्यान बैल मशागतीची कामे आटोपून मोकळ्या शेतात बैलगाडीला बैलांना बांधून ठेवले होते. पावसाला सुरुवात होण्याअगोदर वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट चालू होता. या वेळी झोडगे यांच्या दोन्ही खिल्लार बैलांवर वीज पडल्याने बैलांचा जागीच मृत्यू झाला.
यासोबतच झोडगे यांची नात स्वरा दत्ता झोडगे हिला देखील बैलाजवळ खेळत असताना विजेचा चटका बसल्याने किरकोळ इजा झाली आहे. ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान माजलगाव पशुवैद्यकीय अधिकारी शेजुळ इंगळे, तलाठी मोरे यांनी घटनास्थळी मृत बैलांचा तात्काळ पंचनामा केला असून, पीडित शेतकऱ्यास मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी केली आहे.
हेही वाचा :
कोल्हापूर : कुरुंदवाड-भैरववाडी येथील दारू अड्डा म्हणजे गुन्हेगारी निर्मितीचे केंद्र
Breaking news : रशियात शिक्षणासाठी गेलेल्या जळगावातील चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
Dhule News |अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्य करणार, धुळे जिल्ह्यात पंधरा दिवसांची मोहीम