तुतारीने विद्यमान आमदारांची झोप उडवली; आढळराव पाटील यांच्या पराभवाने राष्ट्रवादी घायाळ

तुतारीने विद्यमान आमदारांची झोप उडवली; आढळराव पाटील यांच्या पराभवाने राष्ट्रवादी घायाळ

मंचर : Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्याचे लक्ष लागलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा खासदार डॉ. अमोल कोल्हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना पराभवाचा धक्का बसल्याने राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी घायाळ झाले आहेत. खासदारकीला मतदारांनी दिलेल्या धक्का विधानसभेसाठी विद्यमान लोकप्रतिनिधींना सावध करणारा ठरल्याची चर्चा सगळीकडे सुरू झाली आहे.
शिरूर मतदारसंघात सामना एकतर्फी
शिरूर लोकसभा मतदारसंघात पहिल्यापासूनच अटीतटीचा सामना होणार असे चित्र होते. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आघाडी घेतली होती. आंबेगाव, शिरूर, खेड, जुन्नर, हडपसर या मतदारसंघातून त्यांना आघाडी मिळाली. सायंकाळी सहा वाजता मतांची अंतिम आकडेवारी समोर आली. डॉ अमोल कोल्हे हे विजयी झाल्याचे कळताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. जुन्नर, आंबेगाव, हडपसर, शिरूर, खेड आणि भोसरी या विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांनी फटाके फोडत एकमेकांना लाडू-पेढे भरवत आनंद व्यक्त केला.
या निकालाने आगामी विधानसभा निवडणुकीत स्थानिक आमदारांच्या विरोधात असणार्‍या नेत्यांचे बळ वाढले आहे. लोकसभा निवडणुकीत ढासळलेला बुरुज दुरुस्त करण्यासाठी विद्यमान आमदारांना पायाला भिंगरी बांधून मतदारसंघात फिरावे लागणार आहे. सर्वसामान्यांशी जवळीक करून नेहमीचा जो ठराविक कार्यकर्त्यांचा गराडा आहे तो दूर करून मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केल्यास त्यामध्ये त्यांना यश येईल; अन्यथा खासदारकीच्या निवडणुकीत मतदारांनी दिलेला धोका विधानसभा निवडणुकीतही बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लोकसभा मतदारसंघातील विविध तालुक्यात ठराविक कार्यकर्ते अर्थात ठेकेदारांना दिलेली कामे आणि त्यांच्याकडून होत असलेली निकृष्ट कामे यावर देखील ग्रामस्थ नाराज आहेत. अनेकवेळा कामाचा दर्जा व्यवस्थित नसल्याचे ग्रामस्थांनी नेत्यांच्या कानी घालूनही केवळ नेत्यांनी ठेकेदारांना आर्थिक प्रलोभनासाठी सांभाळल्याने त्याचाही उद्रेक लोकसभा निवडणुकीत झाल्याचे दिसून येते.
वक्तृत्व व संसदेतील कामकाजाचा कोल्हे यांना फायदा
खासदार डॉ. अमोल कोल्हे दुसर्‍यांदा विजयी झाले असून त्यांच्या विजयामागे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मोलाचा वाटा आहे. खासदार कोल्हे हे उच्चशिक्षित असून त्यांनी संसदेत केलेली भाषणे गाजलेली आहेत. कांदा प्रश्नासह विविध प्रश्नांवर त्यांनी संसदेत आवाज उठवला असल्याने त्यांची हीच जमेची बाजू त्यांनी मतदारांसमोर ठेवली होती. याचा फायदा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना झाला व जनतेने मतदानरूपी आशीर्वाद देत कोल्हे यांना पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून आणले आहे.
जाणून घ्या आढळराव पाटील यांच्या पराभवाची कारणे:
वळसे पाटील यांच्या अनुपस्थितीचा फटका
लोकसभा निवडणुकीच्या ऐन प्रचाराच्या वेळी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा घरात पाय घसरून अपघात झाला व ते जखमी होऊन रुग्णालयात दाखल झाले. संपूर्ण लोकसभा निवडणुकीत ते प्रचारात न आल्याने याचा मोठा फटका महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना बसला. वळसे पाटील प्रचारात सक्रिय नसल्यामुळे त्याचा परिणाम शिरूर लोकसभा मतदारसंघावर होऊन त्यांचे कार्यकर्त्यांनीही म्हणावा असा प्रचार केला नसल्याची अंतर्गत चर्चा आहे.
पक्ष बदलला अन् घात झाला
गेल्या काही वर्षात राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या. शिवसेना पक्ष फुटून एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे यांना सोडून शिवसेना पक्षाचे 40 आमदार घेऊन भाजपबरोबर गेले व त्यांनी वेगळी सत्ता स्थापन केली. त्यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्यावर अन्याय करतो असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात गेले. आढळराव पाटलांचे उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदे यांना साथ देणे जनतेला पसंत पडले नाही. त्यातच ऐन निवडणुकीच्या तोंडावर ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर त्यांनी नेहमी टीका केली, त्याच पक्षाकडून तिकीट घेऊन घड्याळाच्या चिन्हावर ते निवडणूक लढले, त्यांचा हाच निर्णय मतदारांना पटला नाही.
पवार, ठाकरे यांना मानणारा वर्ग मोठा
शिरूर लोकसभा मतदारसंघात शरद पवार, उद्धव ठाकरे यांना मानणारा वर्ग मोठा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटण्याअगोदर असणारे आमदार हे शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार होते. जुन्नरचे आमदार अतुल बेनके, आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील, शिरूरचे आमदार अशोक पवार, खेडचे आमदार दिलीप मोहिते, हडपसरचे आमदार चेतन तुपे या सर्व आमदारांनी शरद पवार यांच्या माध्यमातून शिरूर लोकसभा मतदारसंघात विविध प्रकल्प, विकास कामे मार्गी लावली आहेत. त्यामुळे जनता आजही त्यांच्यावर विश्वास ठेवते. तसेच बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग व कट्टर शिवसैनिक या मतदारसंघात असल्याने त्यांनीही या वेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना साथ दिली असून महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या पाठीमागे उभे राहिले.
शेतकरीवर्ग भाजपवर नाराज
दुधाचे पडलेले बाजारभाव, कांद्याला मिळत नसलेला बाजारभाव या शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांवर केंद्र व राज्य सरकारने योग्य ते निर्णय न घेता शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडल्याची भावना शेतकरी वर्गात पसरली होती. भाजप सरकारच्या काळात शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले असून शेती पिकांना बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग भाजप सरकारवर प्रचंड नाराज होता. शिरूर लोकसभा मतदारसंघात कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात असल्याने नाराज शेतकरी वर्गाचे भाजप विरोधी पक्षाला मतदान झाल्याने याचा फटका शिवाजीराव आढळराव पाटील यांना बसला असल्याची चर्चा मतदारसंघात आहे.
फोडाफोडीचे राजकारण पटले नाही
राज्यात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता असताना भाजपने प्रथम शिवसेना पक्ष फोडून एकनाथ शिंदे यांच्यासमवेत सत्ता स्थापन केली असे बोलले जात आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष व पक्षाचे नाव हे देखील मिळवले. त्यानंतर अजित पवार यांनी बंड करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला व तेही भाजपला जाऊन मिळाले. राज्यात घडलेल्या या घडामोडी जनतेला पचनी पडल्या नाहीत. त्याचा देखील फटका आढळराव पाटील यांना बसला.
हेही वाचा 

कंगनाने मोदींचा फोटो शेअर करून पुन्हा वेधलं लक्ष, या फोटोची खास बात आहे तरी काय?
चंद्राबाबू नायडू यांचा शपथविधी लांबणीवर!, आता १२ जून मुख्‍यमंत्रीपदाची शपथ घेण्‍याची शक्‍यता
Sunita Williams | मोहीम फत्ते; तिसऱ्या प्रयत्नात भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स यांनी इतिहास रचला