भारताचा धमाकेदार प्रारंभ; टी-20 वर्ल्डकपमध्ये आयर्लंडवर 8 विकेटस्नी मात
न्यूयॉर्क; वृत्तसंस्था : टी-20 विश्वचषक 2024 स्पर्धेचा भारताने विजयी प्रारंभ केला. बुधवारी झालेल्या सामन्यात भारताने आयलर्र्ंडचा 8 विकेटस् आणि 48 चेेंडू शिल्लक ठेवून मोठा विजय मिळवला. या सामन्यात भारतीय गोलंदाज चमकले. अर्शदीप सिंगने आयर्लंडला सुरुवातीला धक्के दिले. मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह यांनी तिखट मारा करून आयर्लंडच्या फलंदाजांना दडपणाखाली आणले. त्याचा फायदा उचलताना हार्दिक पंड्याने 3 विकेटस् घेतल्या. त्यामुळे आयरिश डाव 96 धावांत संपला. त्यानंतर रोहित शर्मा (52) आणि ऋषभ पंत (36) यांनी विजय सुकर केला.
न्यूयॉर्कच्या नासाऊ स्टेडियमवर आयर्लंडच्या दोन आकडी धावसंख्येचा पाठलाग करताना रोहित शर्मा आक्रमक झाला. परंतु, त्याचा नवा जोडीदार विराट कोहली पाच चेंडूंत संघर्ष करून एका धावेवर तंबूत परतला. त्यानंतर रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांनी थोडा सावध खेळ केला. पॉवर प्लेमध्ये भारताच्या 1 बाद 39 धावा झाल्या होत्या. भारताच्या 50 धावा होण्यासाठी 47 चेेंडू खपले; पण दुसरीकडे रोहित शर्माने 36 चेंडूंत अर्धशतक केले. पण त्यानंतर दोन धावा करून तो जखमी निवृत्त झाला. त्याच्या जागी आलेल्या सूर्यकुमार यादवला फारसे काही करता आले नाही. तो 2 धावांवर बाद झाला. परंतु, ऋषभ पंतने मॅकार्थीला अप्रतिम रिव्हर्स स्कूप मारून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ऋषभ 36 धावांवर नाबाद राहिला. भारताने 12.2 षटकांत हे विजयी लक्ष्य गाठले.
तत्पूर्वी, चार जलदगती गोलंदाज खेळवण्याचा रोहित शर्माचा निर्णय यशस्वी ठरला. अर्शदीप सिंगने भारी सुरुवात करून दिली. त्याने पहिल्या स्पेलमध्ये पॉल स्टर्लिंग (2) व अँड्र्यू बालबर्नी (5) ही जोडी 9 धावांवर माघारी पाठवली. दुसर्या बाजूने हार्दिक पंड्याने गोलंदाजीचा मोर्चा सांभाळताना आयर्लंडला तिसरा झटका दिला. त्याने लोर्कन टकरचा (10) त्रिफळा उडवला. आयर्लंडचे फलंदाज गोंधळलेल्या, घाबरलेल्या परिस्थितीत दिसले आणि बुमराहने अप्रतिम बाऊन्सरवर त्यांना आणखी एक धक्का दिला. हॅरी टेक्टर (4) माघारी परतला. हार्दिक व मोहम्मद सिराज यांनी त्यानंतर अनुक्रमे कर्टिस कॅम्फर (12) आणि जॉर्ज डॉकरेल (3) यांना बाद केले. हार्दिकने तिसरी विकेट घेताना मार्क एडायरची (3) विकेट मिळवली.
अक्षर पटेलने त्याच्या पहिल्याच षटकात अप्रतिम रिटर्न कॅच टिपून बॅरी मॅकार्थीला भोपळ्यावर तंबूत पाठवले. आयर्लंडचे शेपूट गुंडाळण्याचा विडा जसप्रीतने उचलला आणि जोश लिटिल (14) याचा अप्रतिम यॉर्कवर त्रिफळा उडवून संघाला नववा धक्का दिला. गॅरेथ डेलानीने मिळालेल्या जीवदानाचा फायदा उचलताना चांगली फटकेबाजी केली आणि अर्शदीपच्या चौथ्या षटकात 16 धावा चोपल्या. आयर्लंडचा शेवटचा फलंदाज रन आऊट झाला आणि संपूर्ण संघ 96 धावांत तंबूत परतला.
टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत 12 वर्षांनी भारतीय गोलंदाजांनी पहिल्या 10 षटकांत 6 विकेटस् घेण्याचा पराक्रम केला. 2012 मध्ये त्यांनी इंग्लंडचे 6 फलंदाज 54 धावांत माघारी पाठवले होते.
टी-20 त भारताने सर्वात कमी धावांत (8-50) प्रतिस्पर्धीचे 8 फलंदाज माघारी पाठवण्याचा पराक्रम या सामन्यात नोंदवला गेला. यापूर्वी 2023 मध्ये अहमदाबाद येथे न्यूझीलंडचे 8 फलंदाज 54 धावांत तंबूत पाठवले गेले होते. हार्दिकने 4-1-27-3 अशी अप्रतिम स्पेल टाकली.
संक्षिप्त धावफलक
आयर्लंड : 16 षटकांत सर्वबाद 96. (गेराथ डेल्नि, जोश लिटल 14. हार्दिक पंड्या 3/27, अर्शदीप सिंग 2/35, जसप्रीत बुमराह 2/6.)
भारत : 12.2 षटकांत 2 बाद 97. (रोहित शर्मा 52, ऋषभ पंत 36. बेन व्हाईट 1/6.)