फडणवीसांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन योगींना बाजूला करण्याचा प्रयत्न : संजय राऊतांचा दावा
नवी दिल्ली; Bharat Live News Media वृत्तसेवा : देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून योगी आदित्यनाथ यांना बाजूला करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी बुधवारी (दि.5) नवी दिल्लीत बोलताना केला आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी आले असताना राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
ते म्हणाले की, महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचे काम करणाऱ्यांनी लोकांच्या भावना दुखावल्या होत्या. त्यामुळे जनतेनेच त्यांना धडा शिकविला आहे. आम्ही ३० जागा जिंकल्या आणि भाजप केवळ नऊवर येऊन थांबला आहे.
राज्यात देवेंद्र फडणवीस फॅक्टर चालला नाही, त्यांचा पराभव झाला असून जनतेनेच त्यांना सेवानिवृत्त केले आहे. त्यामुळे ते आता जनतेची काय सेवा करणार, असा टोलाही त्यांनी लगावला. योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. फडणवीसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून योगी यांना हटविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात भाजपला कमी जागा मिळाल्या म्हणून फडणवीस राजीनामा देण्याची तयारी दाखवित आहेत. फडणवीस यांनी राजीनामा दिल्यास योगी आदित्यनाथ यांच्यावरही दबाव वाढून त्यांना राजीनामा द्यावा लागेल. हा भाजपचा डाव असल्याचा दावाही राऊत यांनी केला. नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू हे फक्त मोदींचे मित्र नाहीत तर सर्वांचे मित्र असल्याचे राऊत यांनी सांगितले.