पंतप्रधान मोदींनी दिला राजीनामा; लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस

पंतप्रधान मोदींनी दिला राजीनामा; लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणूक निकालाचे चित्र मंगळवारी स्पष्ट झाले आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला बहुमत मिळाले आहे. नवीन सरकार स्थापनेबाबत आज (दि. ५) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी एनडीएची बैठक झाली. यानंतर पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. १७ वी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस त्यांनी राष्ट्रपतींकडे केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत १७ वी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस करण्यात आली. सध्याच्या १७ व्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून रोजी संपत आहे. लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो, परंतु पंतप्रधान किंवा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच राष्ट्रपती लोकसभा विसर्जित करू शकतात. आता मंत्रिमंडळाने लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस केली असून, राष्ट्रपतींच्या मान्यतेने १७ वी लोकसभा विसर्जित केली जाईल.
नव्या सरकारचा शपथविधी 8 जूनला
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला सभागृहात बहुमत मिळाल्यानंतर संभाव्य सरकार स्थापनेच्या मुद्द्यावर चर्चा झाली. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळाची ही शेवटची बैठक आहे. ७ जून रोजी संसदीय पक्षाची बैठक होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे ८ जून रोजी नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होऊ शकतो.
हेही वाचा : 

नितीश कुमार ‘इंडिया’ आघाडीत येणार? तेजस्‍वी यादव म्‍हणाले, “पुढे काय…”
इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर पुढील रणनीती ठरणार : शरद पवार