Lok Sabha Election 2024 Results : महाविकास आघाडीची मुसंडी
मुंबई, Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी या सामन्यात कोण विजयी होणार, याकडे देशासह राज्यातील जनतेसह संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. या सामन्यात अखेर विरोधकांच्या महाविकास आघाडीने सत्ताधारी पक्षांच्या महायुतीवर वर्चस्व मिळवले. महाविकास आघाडीला 30 जागा मिळाल्या, तर महायुतीला 17 जागावर समाधान मानावे लागले. एक जागा अपक्षाच्या वाट्याला गेली.
काँग्रेसला या निकालाने नवसंजीवनी दिली असून, सलग दोन लोकसभा निवडणुकांमधील पराभवानंतर या पक्षाने घवघवीत यश मिळविले. 2019 मध्ये केवळ 1 जागा जिंकणार्या काँग्रेसने 13 जागा जिंकत राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून आपले स्थान अधोरेखित केले आहे.
राज्य आणि देशाचे लक्ष लागलेल्या बारामतीत शरद पवारांनी अजित पवारांना आपली ताकद दाखवून देत सुप्रिया सुळे यांचा विजय निश्चित केला.
लोकसभा निवडणुकीत राज्यात 45 पारचा नारा देणारी महायुती 20 पारचा पल्लाही गाठू शकली नाही. केंद्रातील मोदी सरकारमध्ये मंत्री असलेले रावसाहेब दानवे, कपिल पाटील, भारती पवार आणि राज्य मंत्रिमंडळातील सुधीर मुनगंटीवार यांचा दारुण पराभव झाला. केंद्रीय मंत्री नारायण राणे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विजय मिळविला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यावर आपलेच वर्चस्व असल्याचे सिद्ध करीत शिवसेना शिंदे गटाने लढलेल्या दोन्ही जागांवर विजय मिळविला. त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी कल्याणचा, तर नरेश म्हस्के यांनी ठाणेचा गड राखला.
मुंबईवर उद्धव ठाकरे शिवसेनेचे वर्चस्व
मुंबईवर पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. देशाच्या आर्थिक राजधानीत सहापैकी बहुसंख्य जागा जिंकत महाविकास आघाडीने महायुतीला विशेषतः भाजपला जबर हादरा दिला. 2019 ला जिंकलेल्या दोन जागांवर मुंबईत भाजपला पराभव पत्करावा लागला.
राज्यातील 48 जागांपैकी 28 जागा लढणार्या भाजपला निम्म्याही जागा जिंकता आल्या नाहीत. महायुतीने कसाबसा 20 जागांपर्यंतचा पल्ला गाठल्याचे दिसत असून, केंद्रातील मोदी सरकारविरोधी लाटेवर स्वार होत महाविकास आघाडीने 30 च्या जवळपास जागा जिंकल्या.
अशोक चव्हाणांना काही दिवसांपूर्वी भाजपात प्रवेश करायला लावूनही भाजपला नांदेडची जागा जिंकता आलेली नाही. विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा काँग्रेसच्या वसंतराव चव्हाण यांनी पराभव केला. सलग पाच वेळा लोकसभा निवडणूक जिंकणारे रावसाहेब दानवे यांचा काँग्रेसचे कल्याण काळे यांनी पराभव केला.
राज्यातील प्रमुख राजकीय घराणे असलेल्या विखे पाटील घराण्यातील विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांचा पहिल्यांदाच लोकसभा लढणारे शरद पवार गटाचे नीलेश लंके यांनी पराभवाची धूळ चारली.
कोल्हापुरातून काँग्रेसचे शाहू महाराज, तर सातार्यातून उदयनराजे भोसले यांनी भाजपच्या तिकिटावर विजय मिळविला. केंद्रीय मंत्रिमंडळातील नितीन गडकरी आणि पियूष गोयल यांनी चांगले मताधिक्य मिळवित सहज विजय नोंदविला.
विदर्भाच्या बालेकिल्ल्यावर पुन्हा काँग्रेस
विदर्भाचा बालेकिल्ला पुन्हा काँग्रेसने परत मिळवत लढलेल्या 7 पैकी 5 जागांवर विजय मिळविला. विदर्भातील 10 पैकी 8 जागांवर महाविकास आघाडी विजयी झाली. हनुमान चालिसा पठणावरून ठाकरे सरकारला लक्ष्य करणार्या नवनीत राणा यांचा महाविकास आघाडीने पराभव केला. मराठवाड्यात संदिपान भुमरे यांनी विजयी होत अनपेक्षित धक्का दिला. मराठवाड्यात भाजप एकही जागा जिंकू शकली नाही. येथे काँग्रेस 3, शिवसेना (ठाकरे) गट 3 आणि शिंदे गटाला एक जागा मिळाली.
उत्तर महाराष्ट्रात 8 जागांपैकी केवळ दोन जागांवर भाजप विजयी झाली, तर उर्वरित सहा जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळविला. काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेना (ठाकरे) यांनी प्रत्येकी दोन जागा जिंकल्या.
पश्चिम महाराष्ट्रातील 10 जागांपैकी दोन जागांवर भाजप, तीन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना शिंदे गट दोन तर काँग्रेस दोन जागांवर विजयी झाली. अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी विजय मिळवत शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांना तिसर्या क्रमांकावर ढकलले. पश्चिम महाराष्ट्रात लढलेल्या तीनही जागांवर विजय मिळवून शरद पवार यांनी आजही या भागाच्या राजकारणावर आपलेच वर्चस्व असल्याचे दाखवून दिले.
महामुंबई-कोकणातील 6 जागांपैकी केवळ एक जागेवर महाविकास आघाडीला यश मिळविता आले. ठाणे, कल्याणवर शिवसेना शिंदे, पालघर आणि रत्नागिरी सिंधुदुर्गवर भाजप, रायगडमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार) आणि भिवंडीत राष्ट्रवादी काँग्रेस (शप)चे सुरेश म्हात्रे यांनी विजय नोंदविला.
वंचित निष्प्रभ
2019 ला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक उमेदवारांच्या पराभवासाठी कारणीभूत ठरून चांगली कामगिरी करणारी वंचित बहुजन आघाडी या निवडणुकीत आपला प्रभाव दाखवू शकली नाही. या आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे स्वतः अकोल्यात पुन्हा एकदा पराभूत झाले, तर एक दोन अपवाद वगळता त्यांचे उमेदवार फारसे मते घेऊ शकले नाहीत.