शेअर बाजार कोसळला! 20 लाख कोटी बुडाले!
मुंबई, वृत्तसंस्था : लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा मोठा फटका मंगळवारी शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना बसला. सेन्सेक्स, निफ्टी कोसळल्यामुळे गुंतवणूकदारांचे सुमारे 20 लाख कोटींचे नुकसान झाल्याचे प्राथमिक चित्र आहे. दिवसअखेर सेन्सेक्स 4389.73 अंकांनी घसरत 72079.05 वर बंद झाला, तर निफ्टीमध्येही 1379.41 अंकांची घसरण होत 21884.50 अंकावर स्थिरावला.
लोकसभा निवडणूक निकालाच्या एक्झिट पोलनंतर खरेदीचे नवनवे उच्चांक प्रस्थापित करणारा शेअर बाजार प्रत्यक्ष निकाल येऊ लागताच, मात्र पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. निवडणुकीचे कल अपेक्षेप्रमाणे येत नसल्याचे पाहून गुंतवणूकदारांनी काढता पाय घेतला. त्यामुळे सेन्सेक्समध्ये 5 हजारहून अधिक अंकांची घसरण झाली, तर निफ्टी 1600 अंकांनी खाली आला. यात तब्बल 20 लाख कोटींचे नुकसान झाले. लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजाराकडे अनेकांचे लक्ष होते.
मागील काही दिवसांपासून तेजीच्या लाटेवर असलेल्या शेअर बाजारात काल मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली होती. एक्झिट पोलनं मोदी सत्ता राखणार, असा अंदाज व्यक्त केल्याचा हा परिणाम होता. बहुतेक एक्झिट पोलनी भाजप आघाडीला 350 च्या वर जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला होता; मात्र निकाल नेमके तसे नसल्याचे चित्र आहे. निवडणुकीचे निकाल अपेक्षित लागत नसल्याचे दिसताच सुरुवातीपासूनच बाजारात घसरण होत असताना अनेक शेअरना लोअर सर्किट लागले. लाखो गुंतवणूकदारांचे पोर्टफोलिओ लालेलाल झाले.