मोकळ्या जागा झाल्या ‘ओपन बार’; नागरिकांकडून कारवाईची मागणी
वडगाव शेरी : कल्याणीनगर येथे अल्पवयीन मद्यपी मुलाने दुचाकीला धडक दिल्याने दोन आयटी अभियंत्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर प्रशासनाने पब, हॉटेल आणि रेस्टॉरंटवर कारवाई केली. परंतु, कल्याणीनगरसह वडगाव शेरी, विमाननगर, खराडी भागातील मोकळ्या जागेत, रस्त्याच्या कडेला दारू पिणार्यांवर अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
परिसरातील मोकळ्या जागांमध्ये रात्री सातनंतर चारचाकी आणि दुचाकी गाड्यांवर बसून मद्यपींचा ओपन बार सुरू असल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसून येत आहे.
या मद्यपींमुळे नागरिकांचे रस्त्यावर चालणेही अवघड होत आहे. सोपाननगर, गुलमोहोर सेंटर, विमानगर वेकफिल्ड आयटी पार्क, विमानतळ रस्त्यावरील मोकळ्या जागा, कल्याणीनगर येथील बिशप शाळेमागे, लँड मार्क गार्डन सोसायटीजवळचा बसथांबा, विमाननगर येथील इबिस हॉटेलमागे, खराडी येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरजवळील मोकळी जागा, झेन्सॉर आयटी पार्क मैदान, निर्मला कॉन्व्हेंट स्कूल ते वर्ल्ड ट्रेड सेंटर रस्ता, आपले घर सोसायटीकडील जाणार्या रस्त्यावरील मोकळी जागा, विमाननगर परिसरातीन ई स्पेस आणि मंत्री कॉम्प्लेक्सजवळील सायकल ट्रॅक, या भागातील पदपथ आणि मोकळ्या जागेमध्ये सायंकाळी सात ते रात्री उशिरापर्यंत दुचाकी आणि चारचाकी वाहनांमध्ये अनेक जण मद्यपान करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
आयटी पार्कमधून सुटलेले कर्मचारी, विद्यार्थी, पीजीमध्ये राहणारे युवक आणि परप्रांतीय नागरिक या भागात घोळका करून पहाटेपर्यंत बसतात. त्यातील अनेक जण मद्यपान करतात. स्थानिक नागरिकांनी हटकल्यानंतर वादावादी होते. मद्यपींकडून रस्त्यावर दारूच्या बाटल्या फोडणे, जोरजोरात ओरडणे आणि परस्परांमध्ये मारहाण करण्याचे प्रकारही घडत आहेत. चंदनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीष पाटील यांनी सांगितले की, रस्त्यावर मद्यपान करणार्यांवर नियमित कारवाई केली जात आहे. येरवडा पोलिस ठाण्यातील अधिकार्यांशी याबाबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
काही दिवसांनंतर परिस्थिती ‘जैसे थे’
सोपाननगरला वाईन शॉपसमोरील रस्त्यावरून जाणार्या महिलांची मद्यपी छेडछाड करतात तसेच मद्यपी रोडरोमिओमुळे सायंकाळी महिला व मुलींना रस्त्यांवरून प्रवास करणे असुरक्षित वाटत आहे. मद्यपींच्या त्रासामुळे परिसरातील नागरिक हैराण झाले आहे. पोलिसांनी मद्यपींचा बंदोबस्त करावा आणि या भागात गस्त सुरू करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी पोलिस आयुक्तांकडे केली. या निवदेनानंतर तात्पुरती कारवाई झाली. मात्र, काही दिवसांनंतर परिस्थिती पुन्हा ’जैसे थे’ झाल्याचे नागरिकांनी सांगितले.
रात्री-अपरात्री महिला कामावरून घरी येतात. त्यांना मद्यपींचा त्रास होतो. प्रशासनाने मोकळ्या जागेत दारू पिणार्यांवर कडक कारवाई केली पाहिजे तसेच या भागात पोलिसांची गस्त वाढविणे गरजेचे आहे.
– पौर्णिमा गादिया, दिशा सामाजिक संस्था
हेही वाचा
गृहनिर्माण संंस्थांचे 601 ’डीम्ड कन्व्हेयन्स’ पूर्ण; जिल्हा उपनिबंधकांची माहिती
जळगाव : चार जूनचा एक्झिट पोलचा मुहुर्त ठरणार निर्णायक
इस्रायलच्या पर्यटकांवर मालदीव घालणार बंदी! गाझा युद्धामुळे निर्णय