विमानाने वाजतगाजत आणले 11 कोटी रुपयांचे पुस्तक!

विमानाने वाजतगाजत आणले 11 कोटी रुपयांचे पुस्तक!

न्यूयॉर्क : नव्या पिढीतील कित्येक जण समाज माध्यमांवर ऑनलाईन पडीक असतात, पण सोशल मीडियावर पुस्तके वाचण्याचे प्रमाण मुळातच खूप कमी आहे. प्रत्यक्ष पुस्तके घेऊन वाचणार्‍या हौशी वाचकांची संख्या मात्र अद्यापही टिकून आहे. असे हौशी वाचक आताही ठिकठिकाणी जात असतानाही सोबत पुस्तक ठेवतात. त्यांना पुस्तक वाचणे आवडते. ते हौसेने विकत घेतात, पण एखाद्या पुस्तकासाठी कोणी 11 कोटी रुपये मोजल्याचे आणि ते पुस्तक देखील चक्क खासगी विमानाने प्रवास करून आले, असे क्वचितच घडले असेल. सध्या हा किस्सा जगभरात कौतुकाचा विषय ठरतो आहे.
अमेरिकन लेखक नेपोलियन हिल यांची साहित्यसंपदा जगभरात प्रसिद्ध आहे. नेपोलियन हिल यांनी अनेकांच्या मनाला आपल्या या साहित्य संपदेच्या माध्यमातून मोठी उभारी दिली आहे, पण त्यांच्या एका पुस्तकासाठी एका उद्योगपतीने भलीमोठी किंमत मोजत ते असे वाजतगाजत आणल्याने त्याची अधिक चर्चा रंगते आहे. सदर पुस्तक 100 वर्षांपूर्वीचे आहे. हे पुस्तक लोकप्रिय अमेरिकन लेखक नेपोलियन हिल यांनी वर्ष 1925 मध्ये लिहिले होते. या पुस्तकाचे नाव ‘द लॉ ऑफ सक्सेस’ असे आहे. अमेरिकेतील इडाहो येथे राहणार्‍या रसेल ब्रनसन या उद्योगपतीने या पुस्तकाची पहिली प्रत खरेदी केली. या प्रतीवर नेपोलियन यांची स्वाक्षरी आहे आणि हेच त्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
रसेल यांना हे पुस्तक ऑनलाईन विक्री होणार असल्याची माहिती मिळाली. नेपोलियन यांच्या स्वाक्षरीची पहिली प्रत मिळत असल्याने त्यांना स्वतःला रोखता आले नाही. त्यांनी हे पुस्तक खरेदीचा विचार पक्का केला. या पुस्तकाची किंमत 1.5 दशलक्ष डॉलर म्हणजे 11 कोटी रुपयांहून अधिक होती, पण रसेल यांनी हार मानली नाही. त्यांनी एक महिना विक्रेत्याचा पिच्छा सोडलाच नाही. शेवटी त्याने तडजोड केली, पण पत्नीला कसे तयार करावे हा मोठा प्रश्वन होता. ते दिव्यही त्यांनी पार पाडले.
रसेल हे उद्योगपती आहेत. त्यांच्याकडे नेपोलियन हिलच्या पुस्तकांचा मोठा संच आहे. त्यांनी अनेक पुस्तकं खरेदी केली आहेत. 11 कोटी रुपये खर्चून पुस्तक आणायचे तर मग कारने कशाला जायचे? विमानाने जाऊयात, त्यामुळे या पुस्ताकाला धूळ-माती सुद्धा लागणार नाही, असा रसेल यांनी केला आणि खासगी विमानाने ते हे पुस्तक घेऊन आले.