सर्वात महागडे बांबूचे मीठ

सेऊल : मीठ हे आपल्या जेवणाचा अविभाज्य घटक आहे. मिठाशिवाय कुठल्याही खाण्याला चव नसते. त्यामुळे मीठ नसेल तर जेवण अधुरे मानले जाते, पण जगातील सर्वात महागडे मीठ कोणते आणि ते किती किमतीला मिळते, याविषयी क्वचितच कल्पना असेल.
वस्तुस्थिती अशी आहे की, जगातील सर्वात महाग असलेले मीठ प्रत्येकजण खरेदी करु शकत नाही. खूप कमी लोक हे मीठ घेऊ शकतात. एरवी आपल्याकडे साधे मीठ 20 ते 30 रुपयांना उपलब्ध होते. काही मिठाचे प्रकार 70-80 रुपयांपर्यंतही असतात; मात्र जगातील महाग मिठासाठी भरपूर पैसे मोजावे लागतात.
जगातील सर्वात महाग असणारे हे मीठ एमेथिस्ट बाम्बू आहे. हे मीठ कोरियामध्ये बनवले जाते. याला कोरियन बाम्बू सॉल्टही म्हणतात. एमेथिस्ट बाम्बू म्हणजेच कोरियन बाम्बू सॉल्ट बाम्बूच्या सिलिंडरमध्ये बनवले जाते. या मिठाच्या 240 ग्रॅम पॅकेटची किंमत 70000 रुपयांपेक्षा अधिक आहे. हे मीठ तयार करण्यासाठी 50 दिवसांपेक्षा अधिक वेळ लागतो.
