महिन्यातच उखडला सिमेंटचा रस्ता; नागरिकांकडून चौकशीची मागणी

महिन्यातच उखडला सिमेंटचा रस्ता; नागरिकांकडून चौकशीची मागणी

येरवडा : Bharat Live News Media वृत्तसेवा : वडगाव शेरी गावठाणातील रस्त्याचे काम पूर्ण होऊन महिनादेखील झाला नाही, तोच त्यावरील सिमेंट उखडण्यास सुरुवात झाली आहे. हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. हे काम पाहणारे अधिकारी आणि संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
एका महिन्यातच काम तमाम
गेल्या एप्रिल महिन्यामध्ये वडगाव शेरी गावठाण येथील शनी मंदिरसमोरील रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले होते. मात्र, या कामास एक महिनादेखील पूर्ण झाला नाही, तो त्यावरील सिमेंट आणि खडी उखडू लागली आहे. रस्त्यावरील सिंमेट व खडी निघाल्यामुळे रात्रीच्या वेळी दुचाकी वाहने घसरून अपघात होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
चौकशी करा: नागरिकांची मागणी
गेल्या मार्च महिन्यात या कामास मंजुरी मिळाली होती. त्यानंतर एप्रिलमध्ये हे काम करण्यात आले. मात्र, एका महिन्यातच रस्त्याची दुरवस्था होऊ लागल्याने नागरिकांनी कामाच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या कामाची चौकशी करून संबंधित अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी
केली आहे.
आमदार निधीतून काम
वडगाव शेरी गावठाण येथील शनी मंदिरसमोरील रस्ता आमदार निधीतून झाला असून, हे कमा सार्वजनिक बांधकाम विभागाने केले असल्याचे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता वैशाली भुक्तर यांनी सांगितले. दरम्यान, यासंदर्भात संबंधित अधिकार्‍यांशी संपर्क होऊ शकला नाही.
हेही वाचा 

निधीअभावी खानापूर पुलाचे काम अर्धवट; बांधकाम विभाग हतबल
सिक्कीममध्ये पुन्हा प्रेमसिंग तमांग यांचे सरकार
अरुणाचल प्रदेश विधानसभेत पुन्हा भाजपचा झेंडा