इंग्रजी पाट्या हटविण्यासाठी सात दिवसांचा अल्टिमेटम
नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा – लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात येताच महापालिका पुन्हा ॲक्शन मोडवर येणार आहे. शहरातील दुकाने, आस्थापनांवरील इंग्रजी पाट्यांकडे महापालिकेने आपला मोर्चा वळविला असून, इंग्रजी पाट्या हटविण्यासाठी सात दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. या मुदतीनंतर मात्र इंग्रजी पाट्या आढळणाऱ्या दुकानदारांविरोधात दंडात्मक कारवाईची मोहीम सुरू केली जाणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दि. २५ नोव्हेंबर २०२३ रोजी आदेश जारी करत महाराष्ट्रात दुकाने, आस्थापनांवर मराठी पाट्या लावणे सक्तीचे केले तसेच इंग्रजी पाट्या असलेल्या दुकानांवर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकाने व आस्थापनांना कर्मचाऱ्यांच्या संख्येनुुसार प्रत्येकी दोन हजार रुपये दंडात्मक आकारणी करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले होते. त्यानुसार नाशिक महापालिकेने शहरातील ६५ हजार दुकाने, आस्थापनांना मराठी पाट्या लावण्यासंदर्भात नोटिसा पाठविल्या होत्या. परंतु दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार महापालिकेला नसल्याचे कारण देत यासंदर्भात कामगार उपायुक्त कार्यालयाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले होते.
कामगार उपायुक्त कार्यालयाकडून महापालिकेला अवघ्या 15 दिवसांतच अभिप्राय प्राप्त झाला. परंतु पत्र मिळालेच नसल्याचा दावा करत कर विभागातील तत्कालीन अधिकाऱ्यांनी कारवाईत चालढकल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, कामगार उपायुक्त कार्यालयाने खुलासा केल्यानंतर ते पत्र समाजकल्याण विभागाकडे असल्याचा साक्षात्कार महापालिकेच्या अधिकाऱ्यांना झाला. दरम्यान, लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली. करवसुली विभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती निवडणूक कामांसाठी करण्यात आल्यामुळे इंग्रजी पाट्यांविरोधातील मोहीम थंडावली होती. मंगळवारी (दि. ४) लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होत आहे. त्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येणार असून, निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांची सेवा पुन्हा महापालिकेत वर्ग केली जाणार आहे. त्यामुळे करवसुलीला वेग येणार आहे. त्याचबरोबर इंग्रजी पाट्यांविरोधातही कारवाईची मोहीम राबविली जाणार असल्याचे उपायुक्त (कर) विवेक भदाणे यांनी सांगितले.
दुकाने, आस्थापनांवरील इंग्रजी पाट्यांविरोधात कारवाईचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार कारवाई केली जाईल. निवडणूक कामासाठी करवसुली विभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मतमोजणीनंतर कर्मचाऱ्यांची सेवा पुन्हा महापालिकेत वर्ग होईल. त्यानंतर पुढील आठवड्यापासून इंग्रजी पाट्यांविरोधात कारवाईची मोहीम राबवली जाईल. – विवेक भदाणे, उपायुक्त(कर), महापालिका.
हेही वाचा:
Nashik City Link | अपघातांमध्ये वाढ; प्रत्येक रविवारी टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण दिले जाणार
Nashik Teachers Constituency: आज रविवारची सुट्टी असल्याने अर्ज प्रक्रीया थंडावली