वय वाढले म्हणून काय झाले? निर्धार कायम : डॉ. आढाव

वय वाढले म्हणून काय झाले? निर्धार कायम : डॉ. आढाव

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : वय वाढले म्हणून काय झाले. आमचा निर्धार कायम आहे. वाढदिवसानिमित्त सर्वांनी माझ्यावर शुभेच्छांचा केलेल्या वर्षावाने भारावून गेलो. 95 व्या वर्षात पदार्पण करताना वाढदिवसाला कार्यक्रम असावा असे काही मला वाटत नव्हते. पण कष्टकरी वर्गाने निर्णय घेतला व तुम्ही सर्वांनी प्रेमाने कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल मी अंतःकरणापासून आभारी असल्याची भावना राज्यातील कष्टकरी वर्गाचे नेते डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केली.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या 94 व्या वाढदिवसानिमित्त गुलटेकडी मार्केट यार्ड येथील हमाल भवन येथे समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी (दि. 1) सकाळी दहाच्या सुमारास बाबा गुलाबी कुडता व पांढरा पायजमा परिधान केलेल्या वेषात सपत्नीक हमाल भवन येथे दाखल झाले. या वेळी, केक कापून राज्यभरातून दाखल झालेल्या कष्टकरी वर्गाने त्यांवर शुभेच्छांचा वर्षाव करत प्रकृती स्वास्थ्याबद्दल सदिच्छा व्यक्त केल्या. या वेळी बाबांना पुष्पगुच्छ भेट देत त्यांच्यासोबत छायाचित्र काढण्यासाठी कष्टकर्‍यांमध्ये चढाओढ लागली. केक, पुष्पगुच्छ व शाल देत कष्टकर्‍यांनी बाबांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला.
कष्टकरी वर्गाच्या नेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव
कार्यक्रमावेळी, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष नांगरे, दि पूना मर्चंटस् चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहार, वालचंद संचेती, सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे, अ‍ॅड. शारदा वाडेकर, राजू खेडेकर, सुभाष लोमटे, हनुमंत बहिरट यांसह अडतदार, व्यापारी, तोलणार, वारणार, हमाल आदी घटकांसह पथारी संघटना, एस. एम. जोशी फाउंडेशन, राष्ट्र सेवा दल, हमाल पंचायत, प्रहार संघटना आदी संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी बाबांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
वाढदिवसानिमित्त आलेल्या कष्टकरी वर्गासाठी कामगार नेते डॉ. बाबा आढाव माथाडी कामगार पगारदार सहकारी पतसंस्थेच्या वतीने सुरूची भोजन ठेवण्यात आले. ज्या कष्टक-यांना कार्यक्रमास येणे शक्य नव्हते त्यांनी व्हॉटस्अप तसेच फेसबुकवर पोस्ट करत बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा

कोल्हापूर : निश्चित ध्येय, कठोर परिश्रम केल्यास यशस्वी करिअर : जिल्हाधिकारी अमोल येडगे
चिमुकल्या पुंगनूर गायींची नवलाई
Virat Kohli : किंग कोहलीचा ICC तर्फे सन्मान! ODI प्लेअर ऑफ द ईयर 2023ची ट्रॉफी प्रदान