महापालिकेचा दणका : एस.टी.महामंडळाने हटविले धोकेदायक होर्डींग्ज
नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा – एस.टी.महामंडळाच्या जागांवरील अनधिकृत होर्डींग्ज कोसळून दुर्घटना घडल्यास एस.टी.महामंडळाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून गुन्हा दाखल करण्याच्या महापालिकेच्या पत्रामुळे एस.टी. महामंडळ खडबडून जागे झाले असून धोकेदायक होर्डींग्ज उतरविण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
मुंबईतील घाटकोपर येथे अनधिकृत होर्डींग्ज कोसळून झालेल्या दुर्घटनेत १७ जण ठार झाल्याची घटना गेल्या महिन्यात घडली होती. या दुर्घटनेनंतर राज्यभरातील अनधिकृत होर्डींग्जचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या संचालकांनी सर्व महापालिकांना पत्र पाठवत होर्डींग्जचे स्ट्रक्चरल आॉडीट करण्याचे आदेश दिले. नाशिक महापालिकेने गेल्या वर्षीच शहरातील सर्व होर्डींग्जचे स्ट्रक्चरल आॉडीटची प्रक्रिया पूर्ण केली होती. परंतू त्यानंतरही शहरातील होर्डींग्जचे फेरसर्वेक्षण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. या सर्वेक्षणादरम्यान पंचवटी बस डेपो येथे पाच, जुने सीबीएस डेपो येथे चार व महामार्ग बस स्थानक परिसरात चार असे एकूण तेरा होर्डिंग्ज अनाधिकृत व धोकेदायक स्थितीत आढळले. त्यामुळे महापालिकेच्या जाहिरात व परवाना विभागाने एसटी महामंडळाला नोटीस बजावली होती. अनाधिकृत व धोकेदायक होर्डिंग तातडीने हटवावे अशा सूचना या नोटीसीद्वारे देण्यात आली होती. सदर होर्डिंग्ज हटविण्यासाठी एसटी महामंडळाच्या मागणीनुसार महापालिकेने दोन दिवसांची मुदत दिली. मात्र आठ दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटला तरी अनधिकृत होर्डिंग काढले गेले नाही. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक घेत दुर्घटना घडेल अशा बाबी टाळण्याचे निर्देश दिले. त्या अनुषंगाने महापालिकेने पंचवटी पोलीस ठाणे, सरकारवाडा तसेच मुंबई नाका पोलीस ठाण्याला पत्र पाठवत एसटी महामंडळाच्या जागेतील अनाधिकृत होर्डिंग कोसळल्यास महापालिकेची जबाबदार राहणार नाही. एसटीच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरावे व त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा असे पत्र दिले. महापालिकेच्या या दणक्यानंतर एस.टी महामंडळ खडबडून जागे झाले असून सीबीएस येथील धोकेदायक होर्डींग्ज उतरविण्यात आले आहेत. उर्वरित होर्डींग्ज देखील उतरविण्यात येणार आहेत.
हेही वाचा:
Virat Kohli : किंग कोहलीचा ICC तर्फे सन्मान! ODI प्लेअर ऑफ द ईयर 2023ची ट्रॉफी प्रदान
रेल्वे मेगा ब्लॉक | एसटी स्थानकांवर गर्दी; प्रवाशांची कसरत