दूध अनुदानाचे 226 कोटी अदा : पुणे जिल्ह्यात शेतकर्यांना मिळाले 83.78 कोटी
किशोर बरकाले
पुणे : राज्य सरकारच्या योजनेनुसार गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपयांप्रमाणे घोषित योजनेनुसार आत्तापर्यंत 226 कोटी 21 लाख 29 हजार 490 रुपयांइतके अनुदान संबंधित दूध उत्पादक शेतकर्यांच्या बँक खात्यांवर जमा करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील 32 संस्थांच्या शेतकर्यांना 83.78 कोटी अनुदान वितरित करण्यात आल्याची माहिती दुग्धव्यवसाय विकास आयुक्त प्रशांत मोहोड यांनी दिली. दुग्धव्यवसाय विकास विभागाने प्रथम 109 कोटी, त्यानंतर 67 कोटी मिळून एकूण 176 कोटी रुपयांइतके अनुदानाचे वितरण केले होते. त्यानंतर नव्याने 62 कोटी एवढे अनुदान वितरित करण्यास दुग्धव्यवसाय विभागाला यश आले असून, अनुदान मिळाल्यामुळे शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
राज्याचे दुग्धव्यवसाय विकास सचिव तुकाराम मुंढे यांनी पशुसंवर्धन विभाग, दुग्धव्यवसाय विभाग आणि दूध डेअर्यांचा संयुक्त सहभाग वाढविण्यास प्राधान्य दिले. जनावरांच्या टॅगिंगमुळे विभागाकडे प्रत्येक शेतकरीनिहाय असलेल्या जनावरांची माहिती आता संकलित झाली आहे. त्यामुळे यापुढे कोणतीही योजना राबविताना या माहितीचा उपयोग शासनाला होणार आहे. त्याचा फायदा शेतकर्यांनाही होण्याची
अपेक्षा आहे. शासनाने दोन महिन्यांसाठी म्हणजे योजनेंतर्गत दिनांक 11 जानेवारी 2024 ते 10 मार्च 2024 पर्यंतच्या कालावधीत गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान मंजूर केले होते. त्यानुसार योजनेत प्रथम 280 कोटींचे अनुदान मंजूर करण्यात आले.
त्यापैकी दुग्ध विभागाला 229 कोटींची अनुदान रक्कम प्राप्त झाली आहे. त्यातून सुमारे 226 कोटींचे वाटप पूर्ण झालेले आहे. दुग्ध विभागाकडे दाखल झालेल्या शिल्लक प्रस्तावांच्या छाननीचे बहुतांश कामकाज संपलेले आहे. प्रलंबित असलेल्या प्रस्तावांची छाननी पूर्ण होताच तेसुध्दा लवकरच अंतिम करून उर्वरित दूध अनुदानाची रक्कम वितरित करण्यात येईल, असेही मोहोड यांनी सांगितले.
जिल्हानिहाय संस्था आणि झालेले दूध अनुदान वाटप रक्कम
क्र. जिल्हा : दूध संस्था : अनुदान रक्कम
1. अहमदनगर : 74 67.51 कोटी
2. पुणे : 32 83.78 कोटी
3. कोल्हापूर: 12 : 20.59 कोटी
4. सांगली : 12 11.22 कोटी
5. सातारा : 24 16.01 कोटी
6. सोलापूर : 17 9.28 कोटी
7. नाशिक : 18 6.25 कोटी
8. धुळे : 3 19.67 लाख
9. जळगाव : 2 1.32 कोटी
10. रत्नागिरी : 2 6 हजार 965 रुपये
11. नागपूर : 3 35.84 लाख
12. भंडारा : 4 16.48 लाख
13. छ. संभाजीनगर : 12 2.86 कोटी
14. बीड : 6 4.18 कोटी
15. जालना : 1 13 हजार 485 रु.
16. धाराशीव : 13 2.19 कोटी
17 लातूर : 1 23.50 लाख
18 बुलडाणा : 2 1.30 लाख
2.93 लाख शेतकरी, 9.42 लाख गायींचे टॅगिंग
गायीच्या दूध अनुदान वितरणात सुमारे दोन लाख 93 हजार 743 शेतकरी आहेत. योजनेनुसार त्यांच्याकडील टॅगिंग पूर्ण झालेल्या नऊ लाख 42 हजार 606 गायींचा समावेश आहे. छाननीत अंतिम झालेल्या प्रस्तावानुसार अनुदानास 45 कोटी 61 लाख 10 हजार 478 लिटर इतके दूध पात्र ठरल्याची माहितीही आयुक्त प्रशांत मोहोड यांनी दिली.
हेही वाचा
पंजाबात मित्र पक्ष विरोधात
ओडिशात तिरंगी लढतींमुळे विजयाचे पारडे दोलायमान
Aliens : एलियन्स गुपचूपपणे पृथ्वीवर येत असतील?