ड्रोनमुळे कोर्‍हाळेकरांनीही रात्र काढली जागून; घरफोड्यांमागे ड्रोनचा संशय

ड्रोनमुळे कोर्‍हाळेकरांनीही रात्र काढली जागून; घरफोड्यांमागे ड्रोनचा संशय

वडगाव निंबाळकर : Bharat Live News Media वृत्तसेवा : वडगाव निंबाळकर, मुढाळे परिसरात शुक्रवारी झालेल्या घरफोड्यांमागे ड्रोनचा हात असल्याचे बोलले जात आहे. वडगाव, को-हाळे, मुढाळे परिसरात गेल्या तीन दिवसांपासून रात्री ड्रोन घिरट्या घालत आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थ धास्तावले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून को-हाळे बुद्रुक परिसर, कठीण पूल, लक्ष्मीनगर, लव्हेवस्ती, पानगेमळा, पेशवेवस्ती, 13 फाटा, निकमवस्ती, वडगाव निंबाळकर व मुढाळे परिसरातील वाड्यावस्त्यांवर हे ड्रोन घिरट्या घालत आहे. रात्रीच्या अंधारात घरांच्या अगदी जवळ हे ड्रोन येत आहे. घराघरांवर घिरट्या घालून ते काय शोधतात? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. विशेष म्हणजे पोलिसांसह कोणत्याही शासकीय यंत्रणेकडून याची उकल होताना दिसत नाही. त्यामुळे ग्रामस्थ अधिकच भयभीत झाले आहेत. त्यातच अनेक अफवा पसरल्या गेल्याने ग्रामस्थ रात्र जागून काढत आहेत.
बुधवारी (दि. 29) रात्री 11 च्या सुमारास लव्हेवस्ती, लक्ष्मीनगर परिसरातील घरांवर ड्रोन फिरत होते. मध्यरात्रीनंतर दोन वाजता धापटेवस्ती येथे ड्रोन फिरू लागले. गुरुवारी (दि. 30) 13 फाटा परिसरात रात्री आठ वाजताच ड्रोन फिरू लागले. रात्री साडेनऊनंतर कठीण पूल परिसरात भोसलेवस्ती, धापटेवस्ती येथे तर घरांच्या अगदी जवळून ड्रोन आले होते. शुक्रवारी (दि. 31) को-हाळ्यातील नामदेवराव पाटील वाचनालयाच्या भागात वारंवार ड्रोन घिरट्या घालत होते. इतक्या रात्रीचे हे ड्रोन नेमकी कशाची टेहळणी करते? चोर्‍यांचा हा नवीन प्रकार तर नव्हे ना? अशी शंका यामुळे निर्माण होत आहे.
खासदार सुळेंकडे मांडला विषय
बारामती तालुक्यासह दौंड, इंदापूर तालुक्यांत रात्रीच्या वेळी अज्ञात ड्रोन फिरत आहे. गेली काही दिवस यासंबंधीच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे शुक्रवारी (दि. 31) खासदार सुप्रिया सुळे यांची सासवड येथे भेट घेत बारामती तालुका वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष दत्तात्रय गावडे व सचिव दत्तात्रय भोसले यांनी हा विषय मांडला. ड्रोनचे गौडबंगाल काय आहे, याची चौकशी व्हावी, शासकीय यंत्रणांकडून ग्रामस्थांना माहिती दिली जावी, अशी मागणी त्यांनी केली.
हेही वाचा

अखेर एमपीएससीने बदलली परीक्षेची तारीख; ही ठरली तारीख
दूध अनुदानाचे 226 कोटी अदा : पुणे जिल्ह्यात शेतकर्‍यांना मिळाले 83.78 कोटी
खा. सुप्रिया सुळेंकडून भिकुले कुटुंबीयांचे सांत्वन