किस्सा खुर्सी का…
– किशोर शां. शेट मांद्रेकर
लोकसभा असो की विधानसभा निवडणुका गोव्यात या निवडणुकांच्या निकालानंतर कोणाचा ‘निकाल’ लागणार, या विषयीची चर्चा रंगू लागते. 4 जून रोजी लोकसभेच्या गोव्यातील दोन जागांचा निकाल लागणार आहे. मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर दोन मंत्र्यांचा डोळा आहे. त्यांनी दिल्लीत लॉबिंग फार पूर्वीपासून केले आहे; पण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे सध्या पूर्ण फॉर्ममध्ये आहेत. तरीसुद्धा मंत्रिमंडळातील काही सदस्यांनी ‘पुडी’ सोडली आहे, की मुख्यमंत्र्यांना दिल्लीत नेणार. पाच सहा राज्यांमध्ये मुख्यमंत्र्यांनी स्टार प्रचारक होते, त्यामुळे त्यांना राष्ट्रीय राजकारणात संधी दिली जाईल, असे काहींना वाटते; तर काही जण अशी संधी त्यांना प्राप्त व्हावी, म्हणून देव पाण्यात बुडवून बसले आहेत. त्यात अजून एक महत्त्वाचे. राज्य मंत्रिमंडळात खांदेपालट झाला, तर पुढील मुख्यमंत्री कोण? यावरही काही जण तर्क करीत आहेत. काँग्रेसमधून फुटून भाजपात आलेल्या आठ आमदारांपैकी दीड वर्षानंतर एका ख्रिस्ती आमदाराची मंत्रिमंडळात वर्णी लागली होती. आता लोकसभेत ज्याच्या मतदार संघात कमी मतदान त्या मंत्र्यांपैकी तिघांची गच्छंती अटळ आहे. म्हणूनच इच्छुक आमदार मंत्री बनण्याची स्वप्नं पाहत आहेत. पहिला नंबर कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांचा असेल म्हणे. कला अकादमी (त्यांच्या मते ताजमहाल; त्यांनीच तर असे विधानसभा अधिवेशनात उदाहरणादाखल म्हटले होते), तब्बल 75 कोटी खर्चूनही इमारत कोसळत आहे; यावरून गहजब झाला आहे. त्यांच्या जागी सभापती असलेल्या रमेश तवडकर यांची वर्णी लागेल, अशी त्यांच्या गोटातच चर्चा आहे. सध्या एसटी समाजातील या दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार युद्ध सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काही मंत्र्यांचा निकाल लागणार आहेच; पण फुटीर काँग्रेसींना संधी मिळते की निष्ठावान भाजप आमदारांना ती दिली जाते, यावर 2027 सालच्या विधानसभा निवडणुकीची नांदी ठरणार आहे.