गोवा: ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी राज्यात जुनेच नियम

गोवा: ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी राज्यात जुनेच नियम

प्रभाकर धुरी

पणजी: देशभरात १ जूनपासून ड्रायव्हिंग लायसन्सचे नवीन नियम लागू केले जातील, तथापि, परवाना मिळविण्यासाठी गोव्यात जुनेच नियम राहतील. मोटार वाहन कायद्यानुसार आवश्यक निकष राज्यातील एकही ड्रायव्हिंग स्कूल पूर्ण करत नसल्याने जुन्या पद्धतीनेच राज्यात ड्रायव्हिंग लायसन्स मिळणार आहेत.
परिवहन विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रादेशिक परिवहन कार्यालयात ड्रायव्हिंग चाचणीशिवाय ड्रायव्हिंग लायसन्स देण्याची परवानगी देण्यासाठी गोव्यात मोठी मान्यताप्राप्त खासगी ड्रायव्हिंग स्कूल नाही.
नवीन नियमांनुसार, सरकारी आरटीओ ऐवजी खासगी ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रांवर ड्रायव्हिंग चाचण्या देता येणार आहेत. या केंद्रांना परवाना पात्रतेसाठी चाचण्या घेण्याची आणि प्रमाणपत्रे जारी करण्याची परवानगी दिली जाईल.
प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन चालवण्याच्या चाचणीनंतर चालकाचा परवाना मिळणार असल्याची माहिती परिवहन विभागाच्या सूत्रांनी दिली. राज्यात जवळपास 126 मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग स्कूल आहेत. तेथे प्रशिक्षण दिले जाते. प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन चालवण्याच्या चाचण्यांनंतर त्यांना परवाना दिला जातो. नवीन मोटार वाहन कायद्यानुसार मान्यताप्राप्त खासगी ड्रायव्हिंग स्कूल स्थापन करण्यासाठी ड्रायव्हिंग स्कूलमध्ये 2 एकर जमीन आणि ट्रॅक असणे आवश्यक आहे.
मात्र, गोव्यात एकही ड्रायव्हिंग स्कूल हा निकष पूर्ण करत नाही. तसे परिवहन विभागाने केंद्र सरकारला कळवले आहे की, मान्यताप्राप्त चालक प्रशिक्षण केंद्राची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे गोव्यात आता ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग जुन्या पद्धतींचा अवलंब करणार आहे.
हेही वाचा 

गोवा : बांबोळीत 2 सिलिंडर्सच्या स्फोटांत 10 झोपड्या खाक
मुंबई-गोवा महामार्गावर लोटे येथे भीषण अपघात; कारची कंटेनरला धडक, ४ जण जखमी
गोवा : सिलिंडरच्या गॅस गळतीमुळे एकाचा गुदमरून मृत्यू