मेट्रोसाठी गणेशखिंड वाहतुकीत बदल : पीएमपीएल बसचे मार्गही बदलले
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोमार्गिकेवरील पाच मेट्रो स्थानकांच्या कामासाठी गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार सर्व प्रकारची मालवाहतूक, खासगी प्रवासी बस, पीएमपीएल बसना ब्रेमेन चौकातून डावीकडे वळून डॉ. आंबेडकर चौकातून जावे लागेल; तर दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांना एबिल हाऊस येथून डावीकडे वळून रेंजहिल्समार्गे जावे लागेल. या बदलानुसार विद्यापीठ रस्त्याने शिवाजीनगरकडे येणार्या वाहनांना एबिल हाऊस ते सिमला ऑफिस चौक हा टप्पा पूर्णपणे बंद असेल.
ब्रेमेन चौक ते सिमला ऑफिस चौक या मार्गावर वाहतूक बदल प्रस्तावित आहे. 1 जूनपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली. वाहतूक उपयुक्त रोहिदास पवार उपस्थित होते. औंध रोडवरील ब्रेमेन चौकामधून पुणे विद्यापीठ चौकामध्ये येणार्या फक्त दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनांना प्रवेश असेल. विद्यापीठ चौकातून डावीकडे वळून ही वाहने विद्यापीठाच्या आतील रस्त्याने व्हॅमनीकॉमच्या मुख्य प्रवेशद्वारातून गणेशखिंड रोडवर येतील. तर, पीएमपी बससह अन्य सर्व जड वाहने ब्रेमेन चौकातून डावीकडे वळून (औंध रस्ता) जयकर पथावरून आंबेडकर चौक-साई चौक-सिंफनी चौक (रेंजहिल्स) येथून कृषी महाविद्यालयाकडील रस्त्याने न. ता. वाडीकडे जातील.
पुणे स्टेशन, नगर रोडकडे जाणार्या वाहनांनी ब्रेमेन चौक येथून डॉ. आंबेडकर चौक-बोपोडी चौकमार्गे मुंबई-पुणे रस्त्यावर जावे. हिंजवडी-सांगवी परिसरामधून येऊन सेनापती बापट रोडवर जाणार्या पीएमपीएल बस ऋषी मल्होत्रा चौकामधून उजवीकडे वळण घेऊन परिहार चौकातून डावीकडे वळण घेऊन बाणेर रोडवरून विद्यापीठ चौकमार्गे धावतील.मेट्रो स्टेशन आर. बी. आय. स्थानक येथील गर्डर लाँचिंग करण्यासाठी विद्यापीठ चौकामधून रेंजहिल्स चौकापासून पुढे गणेशखिंड रोडवरून सर्वप्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहील. या मार्गावर रेंजहिल्स कॉर्नर येथून जावे लागेल. सिमला ऑफिस चौकामधून सीओईपी हॉस्टेलच्या बाजूने स. गो. बर्वे चौकाकडे प्रवेश बंद राहील. संचेती हॉस्पिटलसमोरून उजवीकडे वळण घेऊन स. गो. बर्वे चौक येथे जावे. संचेती हॉस्पिटलसमोरील अंडरपास दररोज रात्री 10 ते सकाळी 7 पर्यंत बंद राहील.
पोल्ट्री फार्म चौक ते रेंजहिल्स रस्ता बंद
पुणे-मुंबई महामार्गावरील पोल्ट्री फार्म चौकामधून रेल्वे अंडरपासमार्गे रेंजहिल्सकडे जाणार्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. विद्यापीठ, औंध, बाणेरकडून येणारी वाहने रेंजहिल्समार्गे पोल्ट्री फार्म चौकातून पुढे मार्गस्थ होतील.
विद्यापीठ चौकातील कामाची पालकमंत्र्यांकडून पाहणी
गणेशखिंड रस्त्यावर सुरू असलेल्या मेट्रो आणि आनंद ऋषिजी चौकातील (पुणे विद्यापीठ चौक) उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी पालकमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी सकाळी सहा वाजता केली. तसेच कामाचा आढावा घेतला. या वेळी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), पोलिस, महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत असल्याने दोन दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी ऑनलाइन बैठकीमध्ये वाहतूक पोलिस आणि महापालिकेच्या अधिकार्यांनी त्यावर तोडगा काढावा, असे आदेश दिले. त्यानंतर अधिकार्यांनी संपूर्ण शहरात फिरून प्रमुख 10 रस्त्यांची पाहणी केली होती. त्यानंतर गुरुवारी (ता. 30) अजित पवार यांनी स्वतः गणेशखिंड रस्त्यावरील कामाची पाहणी केली.
विद्यापीठ चौकात उड्डाणपूलासाठी 55 मिटर लांबीचा गर्डर टाकला जाणार आहे. त्यामुळे या चौकातील वाहतुकीमध्ये बदल होणार आहे. हा गर्डर कसा टाकला जाणार, त्याची तयारी कशी सुरू आहे, याची माहिती पवार यांनी यावेळी घेतली. गणेशखिंड रस्त्यावर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे, त्यासाठी महापालिकेने व पीएमआरडीएने उपाययोजना कराव्यात अशा सूचना दिल्या. कृषी महाविद्यालय ते रेंजहिल्स या पर्यायी रस्त्याची पवार यांनी पाहणी केली. या भागात कोणतीही अप्रिय घटना होऊ नये यासाठी महापालिकेने पथ दिवे लावावेत, पोलिसांची गस्त वाढवावी अशा सूचना दिल्या आहेत, असे अधिकार्यांनी सांगितले. दरम्यान, लोकसभा निवडणुकीचे मतदान झाले आहे, मतमोजणीसाठी अवघे काही दिवस शिल्लक आहे. पण अद्याप आचारसंहिता लागू आहे. तरीही पवार यांनी अधिकार्यांच्या उपस्थितीमध्ये पाहणी दौरा केला.
हेही वाचा
दारूच्या बिलावरून सोरतापवाडीत राडा
Donald Trump: पॉर्न स्टारला पैसे दिल्याप्रकरणी डोनाल्ड ट्रम्प दोषी
पंतप्रधान मोदींची दुसऱ्या दिवशही विवेकानंद शिलेवर ध्यानधारणा; पहा व्हिडीओ