काश्मीरमध्ये उभारणार छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक : पुनीत बालन

काश्मीरमध्ये उभारणार छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक : पुनीत बालन

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : लष्कराच्या सहकार्याने काश्मीरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे. महाराजांच्या या पुतळ्याकडे बघून जवानांना प्रेरणा मिळते. त्याचप्रमाणे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आणि भव्य स्मारक जम्मू- काश्मीरमध्ये उभारू, अशी घोषणा ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष व युवा उद्योजक पुनीत बालन यांनी केली.
‘विश्व हिंदू मराठा संघ व स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त डेक्कनमध्ये आयोजित कार्यक्रमात बालन बोलत होते. या वेळी ते म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारखा योद्धा या युगात झालेला नाही. मी भारतीय लष्करासमवेत काश्मीरमध्ये काम करतो. आपले भारतीय सैनिक जेव्हा जेव्हा युद्धाला जातात तेव्हा तेव्हा ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे धैर्य, शौर्य आणि पराक्रम डोळ्यांसमोर ठेवून लढत असतात. त्यांची ही प्रेरणाच आपल्या शूर जवानांना लढण्यासाठी मोठे बळ देत असते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याप्रमाणेच कश्मीरमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य असा पुतळा आणि स्मारक लष्कराच्या साहाय्याने आणि ’पुनीत बालन ग्रुप’च्या माध्यमातून विश्व हिंदू मराठा संघाला सोबत घेऊन उभारले जाईल. महाराजांच्या पुढील वर्षीच्या जयंतीच्या आधी स्मारकाचे काम पूर्ण करू, अशी ग्वाही या वेळी बालन यांनी दिली. या वेळी शहरातील प्रतिष्ठित मंडळी, शिव-शंभूभक्त आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे अखंड भारत देशाचे आराध्य दैवत आहेत. स्वराज्य निर्माण करून त्यांनी घालून दिलेला आदर्श हा आपल्या सर्वांसाठीच पथदर्शी आहे. आजच्या युवा पिढीनेही याच मार्गाने वाटचाल केली पाहिजे यासाठी या दोन्ही राजांची स्मारके गरजेची आहेत. म्हणूनच आम्ही काश्मीर खोर्‍यात छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य असा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
– पुनीत बालन, अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप

हेही वाचा

गायनाच्या कार्यशाळेला कस्तुरींचा प्रतिसाद; ‘Bharat Live News Media’ कस्तुरी क्लबचा उपक्रम
पैसे घ्या आणि मुदतवाढ द्या!
म्हाडाच्या घरांसाठी अर्जास पुन्हा मुदतवाढ!