गरीब रुग्णांचे आशास्थान ससून; भ्रष्टाचार्यांसाठी बनले ’लूट केंद्र’
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : ससून सर्वोपचार रुग्णालय गरीब आणि गरजू रुग्णांसाठी आशास्थान मानले जाते. दररोज हजारो रुग्ण मोफत उपचारांच्या आशेने ससूनमध्ये येतात; मात्र बाह्यरुग्ण विभाग, तपासण्या, स्वच्छता, उपचार अशा सर्वच बाबतीत रुग्णांचे हाल होत आहेत. दुसरीकडे, ससूनमधील डॉक्टरांची आर्थिक लाभाची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे ससूनमध्ये ‘रुग्णांचे हाल; डॉक्टर मात्र मालामाल’ असे चित्र पाहायला मिळत आहे.
ससून सर्वोपचार रुग्णालय गेल्या दीड वर्षांमध्ये धक्कादायक घटनांमुळे वादाच्या भोवर्यात अडकले आहे. किडनी तस्करी प्रकरणात ससूनमधील अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यानंतर, ड्रगतस्कर प्रकरणातील आरोपी ललित पाटील रुग्णालयातून पळून गेल्यानंतर अनेक आर्थिक लागेबांधे असल्याचे धागेदोरे हाती लागले. दुसरीकडे, उंदीर चावल्यामुळे आयसीयूमध्ये सामान्य रुग्णाचा मृत्यू झाला. त्यातच आता अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्याची एखाद्या चित्रपटामध्ये शोभेल अशी घटना ससूनमध्ये घडली. त्यामुळे ससूनमध्ये रुग्णसेवेला प्राधान्य दिले जाते की, वैयक्तिक लाभाला, अशी शंका निर्माण होत आहे.
असे होतात रुग्णांचे हाल
ससून रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, रुग्णांना बसण्यासाठी पुरेशी जागा नाही, चांगली स्वच्छतागृहे नाहीत. रुग्णांना रुग्णवाहिकेतून बाहेर काढण्यासाठी स्ट्रेचर किंवा कर्मचारीही उपलब्ध नसतात. नातेवाईकच रुग्णांची खुर्ची किंवा स्ट्रेचर ढकलत एका विभागातून दुसर्या विभागात हेलपाटे मारताना दिसतात. मोफत औषधे उपलब्ध करून देणे अपेक्षित असताना खासगी औषधविक्रेत्यांचे खिसे भरण्यासाठी काही डॉक्टरच बाहेरच्या औषधांची चिठ्ठी देतात. दुसरीकडे, रुग्णांना सिटी स्कॅन, एमआरआय अशा चाचण्यांसाठी दोन-दोन आठवडे प्रतीक्षा करावी लागते. ससून रुग्णालय कायम वादाच्या भोव-यात अडकले असताना रुग्णसेवेला कधी प्राधान्य दिले जाणार, असा प्रश्न सामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे.
दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मी गेल्या दीड महिन्यांपासून ससून रुग्णालयात हेलपाटे घालत आहे. माझा मुलगा दिव्यांग असून त्याचा बस पास तसेच इतर सवलतींसाठी प्रमाणपत्र आवश्यक आहे. मात्र ससूनमध्ये आल्यावर वेबसाईट बंद असल्याचे सांगून वारंवार परत पाठवण्यात येत आहे. ससूनमध्ये अनेकाना दिव्यांग प्रमाणपत्रे मिळाली नाहीत.
– एकनाथ ढोले, नागरिक
डॉक्टरांनी माझ्या आईची एमआरआय तपासणी करायला सांगितली आहे. खासगी रुग्णालयांमध्ये आठ ते दहा हजार रुपये खर्च सांगितला आहे. माझी आर्थिक परिस्थिती नसल्याने मी आईला घेऊन दोन आठवड्यांपूर्वी ससूनमध्ये आलो होतो. पेशंट वेटिंगवर असल्याने त्यांनी मला दोन आठवड्यानंतर येण्यास सांगितले. गुरुवारी रुग्णालयात आल्यावर पुन्हा चार दिवसानंतरची तारीख देण्यात आली आहे.
– मनोज जाधव, रुग्णाचे नातेवाईक
असे होतात डॉक्टर मालामाल!
ससूनमध्ये वैद्यकीय बिले मंजूर करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चतुर्थ श्रेणी कर्मचार्यावर कारवाई होते; त्याचवेळी आरोपी ललित पाटीलची ’फाईव्ह स्टार’ बडदास्त ठेवण्यासाठी खुद्द अधिष्ठात्यांनी लाखो रुपये घेतल्याचे समोर येते. औषध खरेदी, कँटीनचे कंत्राट, वैद्यकीय बिले, ह्रदयरोगाच्या शस्त्रक्रिया, रुग्णांवरील औषधोपचार, शवविच्छेदन अहवाल, दाखले अशा सर्व कामांसाठी चतुर्थ श्रेणी कर्मचारी ते प्रथम वर्गातील वैद्यकीय अधिकारी आर्थिक बोली लावत असल्याच्या धक्कादायक घटना वारंवार घडत आहेत. आर्थिक लाभ मिळवण्यासाठी कनिष्ठांपासून वरिष्ठांपर्यंत साखळीच तयार होत असल्याचे सर्व प्रकरणांमधून समोर येत आहे.
हेही वाचा
चीनमध्ये सापडल्या डायनासोरच्या पावलांच्या खुणा
Water Scarcity | पाण्याचे स्त्रोत संपुष्टात आल्याने पाणीबाणी
स्वयंपाकी मानधन घोटाळा 28 लाखांवर