शिरूरमध्ये महायुती, महाविकास आघाडीचे तीन-तीन विधानसभेवर लक्ष

शिरूरमध्ये महायुती, महाविकास आघाडीचे तीन-तीन विधानसभेवर लक्ष

शिक्रापूर : Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या निकालाची तारीख दि. 4 जून ही जशी जवळ आली आहे तशी कार्यकर्ते व नागरिकांची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व महाविकास आघाडीकडून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यामध्ये झालेल्या लढतीत कोण विजय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही बाजूंनी मोठ्या मताधिक्याने आपले उमेदवार निवडून येणार असा दावा केला जात होता. परंतु मतदान झाल्यानंतर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी यथावकाश आढावा घेतला. यानुसार दोन्ही उमेदवारांचे समर्थक आता ही लढत काही हजारांमध्ये होईल असे भाकित वर्तवत आहेत. दोन्ही उमेदवारांचे लक्ष मतदारसंघातील तीन-तीन विधानसभा मतदारसंघावर केंद्रित झाले आहे.
महायुतीची मदार भोसरी, हडपसर आणि आंबेगाववर
या निवडणुकीमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांची विजयासाठी मतांची मदार शहरी भागातील भोसरी, हडपसर व त्यांचे होम पीच असलेल्या आंबेगाववर अवलंबून आहे. यातही महायुतीच्या कार्यकर्त्यांना भोसरी विधानसभेतून 50 हजार मतांपेक्षा अधिकचे मताधिक्य मिळेल व भोसरी विधानसभा आढळराव पाटलांच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलेल अशी अपेक्षा आहे, तर ग्रामीण भागातील डॉ. अमोल कोल्हे यांचे होमपीच असलेले जुन्नर तसेच पूर्णतः ग्रामीण भाग असलेले खेड, शिरूर-हवेलीमधून मोठ्या मताधिक्याची अपेक्षा डॉ. कोल्हे यांना आहे. खेड विधानसभेमधून मोठे निर्णायक मताधिक्य डॉ. कोल्हे घेतील, असा दावा त्यांचे समर्थक करत आहे.
तब्बल दोन महिन्यांपूर्वी आढळराव पाटील व डॉ. कोल्हे यांच्यामध्ये लढत झाल्यास आढळराव पाटील यांचे पारडे जड असल्याचे चित्र होते. परंतु राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या लढतीला आढळराव विरुद्ध कोल्हे असा रंग न राहता शरद पवार विरुद्ध अजित पवार असा रंग आला.
ऐनवेळी आढळराव यांचा राष्ट्रवादीतील प्रवेशही बर्‍याच मतदार व कार्यकर्त्यांना रुचला नाही. शेतकर्‍यांमध्ये भाजपाप्रति असलेला रोष तसेच शरद पवार यांच्याविषयीची प्रचंड सहानुभूती ग्रामीण भागातील मतदारांमध्ये दिसून येत होती. याचा फायदा नक्कीच डॉ. कोल्हे यांना होताना दिसून येत आहे. आढळराव पाटील यांचा असलेला दांडगा जनसंपर्क व सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा माणूस अशी असलेली प्रतिमा याच्या जोरावर ग्रामीण भागातील शरद पवारांची सहानुभूतीची लाट ते किती थोपवितात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाविकास आघाडी जुन्नर, खेड आणि शिरूरवर केंद्रित
जुन्नर विधानसभेतील मागील पंचवार्षिकला डॉ. कोल्हे यांना मिळालेले मताधिक्य घटेल तसेच डॉ. कोल्हे यांनी आंबेगाव विधानसभेतून मागील वेळी तब्बल 25 हजारांच्या जवळ घेतलेले मताधिक्य हे पूर्णपणे वजा होऊन आढळराव पाटील आंबेगावमधून आघाडीवर राहतील, असा समर्थकांचा दावा आहे. भोसरीमध्ये मताधिक्यामध्ये मोठी वाढ होईल, तसेच हडपसर मतदारसंघामध्ये 15 हजारांच्या आसपास मताधिक्य घेऊन आढळराव पाटील विजयी होतील, असा कयास महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून मांडला जात आहे. तर खेड विधानसभेतून मोठ्या प्रमाणावर कोल्हे यांनी लीड घेतले तर गणित बिघडण्याची शक्यता दबक्या आवाजात महायुतीचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.
कोल्हे यांचे समर्थक जुन्नर तालुक्यातून मोठी आघाडी घेतानाच ते आंबेगावमध्ये आढळराव पाटील यांना रोखण्यात यशस्वी होतील व जुन्नर आणि शिरूर-हवेली, खेड व हडपसर विधानसभा मतदारसंघातून आघाडीवर राहून विजय प्राप्त करतील, असा दावा महाविकास आघाडीचे कार्यकर्ते करत आहेत. सर्वात जास्त मताधिक्य खेड विधानसभा मतदारसंघात मिळेल अशी शक्यताही डॉ. कोल्हे यांचे समर्थक व्यक्त करीत आहेत.
हेही वाचा 

दारूच्या बिलावरून सोरतापवाडीत राडा
Donald Trump: पॉर्न स्टारला पैसे दिल्याप्रकरणी डोनाल्ड ट्रम्प दोषी
पंतप्रधान मोदींची दुसऱ्या दिवशही विवेकानंद शिलेवर ध्यानधारणा; पहा व्हिडीओ