Pune Crime | जमिनीच्या वादातून युवतीला जिवंत गाडले
वेल्हे : Bharat Live News Media वृत्तसेवा: वेल्हेजवळील कोंढावळे खुर्द (ता. राजगड) येथे वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून 15 ते 16 समाजकंटकांनी प्रणाली बबन खोपडे (वय 22) या युवतीला शेतातील खड्ड्यात जिवंत गाडले. त्यावेळी प्रणालीची आई कमल बबन खोपडे हिच्या प्रसंगावधानतेने तिचे प्राण वाचले. हा प्रकार बुधवारी (दि. 29) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडला. घटनास्थळी वेल्हे पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी देखील उपस्थित होते. त्यामुळे वेल्हे राजगडसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
कोंढावळे खुर्द येथील बबन खोपडे यांच्या गट क्रमांक 124 मध्ये जमिनीचा बळजबरीने ताबा घेण्यासाठी जेसीबी तसेच ट्रॅक्टर घेऊन समाजकंटक आले होते. त्यावेळी प्रणाली, आई कमल व लहान बहिणेने ताबा घेणार्यांना विरोध केला. त्यावेळी जेसीबीने खड्डा खोदून त्यात प्रणाली हिला गाडण्यात आले. याबाबत प्रणाली हिने वेल्हे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
आईच्या प्रसंगावधानतेने मुलीचे प्राण वाचले
दरम्यान याप्रकरणी व्हिडिओ व्हायरल झाला असून पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षकांकडे प्रणाली खोपडे हिने दाद मागितली आहे. प्रणाली म्हणाली, जमिनीचा ताबा घेण्यासाठी आलेल्या समाजकंटकांनी मला खड्ड्यात गाडले. त्यावेळी आईने माझा जीव वाचवला. ही 60 गुंठे जमीन खोपडे यांच्या वडिलोपार्जित मालकी व वहिवाटीची आहे. काही समाजकंटकांनी महसूल अधिकार्यांना खोटी कागदपत्रे करून ही जमीन पुनर्वसनासाठी संपादित केली. याबाबत न्यायालयात दावा दाखल असल्याचे प्रणाली खोपडे हिने निवेदनात म्हटले आहे.
याबाबत वेल्हे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन खामगळ म्हणाले, या प्रकरणी चौकशी सुरू आहे. रितसर तपास करून योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. अद्याप कोणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
हेही वाचा
नाशिक: ग्रामीण पाठोपाठ शहरातील नागरिकही पाणीटंचाईने त्रस्त
पंढरपूर : विठ्ठलाचे सोने, चांदीचे दागिने कधी वितळवणार?
गणपतीपुळेत समुद्राची पाणी पातळी वाढली; यंदाही मोठ्या लाटांची भीती