pune porsche accident : पोलिस आयुक्तांनी घेतली अजित पवारांची भेट
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारी दि. 30) सकाळी सात वाजता पालकमंत्री अजित पवार यांची त्यांच्या जिजाई बंगल्यावर भेट घेतली. या वेळी पवार यांनी अमितेश कुमार यांच्याकडून कल्याणीनगर अपघात प्रकरणाची माहिती घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, ही भेट शहरातील वाहतुकीच्या अनुषंगाने असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले. दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दोन दिवसांपूर्वी पवार यांच्यावर अपघाताच्या अनुषंगाने गंभीर आरोप केले होते. पवार यांनी अपघाताबाबत आत्तापर्यंत थेट भाष्य करण्याचे टाळले होते.
अपघाताबाबत सर्व स्तरांतून टीका झाल्यानंतर तपासाची माहिती घेण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पोलिस आयुक्तालयात येऊन प्रकरणाची माहिती घेतली होती, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. ते दररोज या प्रकरणाच्या तपासाचा अहवाल मागवून घेतात. या अपघात प्रकरणानंतर पहिल्यांदाच पोलिस आयुक्त अमितेश कुमार आणि पालकमंत्री यांची आज भेट झाली. या भेटीदरम्यान अपघात प्रकरणाची चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, पवारांनी नेमकी कोणती माहिती घेतली, हे मात्र समजू शकले नाही.
अपघातानंतर पोलिसांचा मिळालेला प्रतिसाद, मुलाला बाल न्याय मंडळाकडून मिळालेला जामीन, स्थानिक राजकीय पुढार्यावर झालेले आरोप, यामुळे नागरिकांच्या मनामध्ये तीव्र संताप निर्माण झाला होता. पोलिसांना मोठ्या प्रमाणात टीकेचे धनी व्हावे लागले. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी या अपघात प्रकरणाशी संबंधित असणार्यांवर गुन्हे दाखल करून धरपकड केली. त्यातच ससून रुग्णालयात मुलाच्या रक्ताचे नमुने बदलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. ससून रुग्णालयातील डॉक्टरांच्या मदतीने बिल्डरने हे काम केले. प्रकरणाचे गांभीर्य वाढल्याने पवार यांनी पोलिस आयुक्तांना भेटीला बोलाविल्याची माहिती आहे.
हेही वाचा
कोल्हापूर जिल्ह्याला रविवारनंतर ‘यलो अलर्ट’
’ते’ रक्त बिल्डरपुत्राच्या आईचे नाही; आईने रक्त दिल्याची होती चर्चा
हरित अर्थव्यवस्थेतील व्यापारतंत्र कळीचा मुद्दा