नाथजोगी समाजातील पहिली मुलगी मॅट्रिक पास

नाथजोगी समाजातील पहिली मुलगी मॅट्रिक पास

भंडारा; Bharat Live News Media वृत्तसेवा : हस्तरेखा पाहून भिक्षा मागण्याच्या परंपरागत व्यवसायात निपुण असलेल्या नाथजोगी समाजात शिक्षणाविषयी अनास्था असतानाच त्यांच्या समाजातील एका युवकाने समाजात ज्ञानाची ज्योत पेटवत मुलींना शिक्षणासाठी प्रेरित केल्याने नाथजोगी समाजातील पहिली मुलगी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. रामबाई गणशुर चव्हाण (१९) रा. कोदामेढी असे या विद्यार्थिनीचे नाव आहे.
लाखांदूर तालुक्यातील कोदामेढी गावात जवळपास १२० कुटुंब असलेले नाथजोगी समाज आहे. हा समाज भटका असून हाताला कोणतेही काम नसल्याने गावोगावी फिरून, दुसऱ्यांच्या हस्तरेखा पाहून, किंगरी वाजवून स्वत:चा प्रपंच चालवितात. हे सर्व करत असताना या समाजातील मुले शिक्षणापासून वंचित राहतात.
भटका समाज असल्याने जन्माला आल्यानंतर मुलाकडे जन्म प्रमाणपत्र नसते. मोठा झाल्यावर त्याचा आधार कार्ड बनत नाही. त्यामुळे या समाजातील बहुतांश मुले शिक्षणापासून वंचित राहतात. बहुधा मुली शिक्षण घेतच नाहीत. मात्र गणशुर यांची मुलगी रामबाई हिने गावातीलच कार्तिक वडस्कर नावाच्या युवकाकडून प्रेरणा घेत चिचाळ/बारव्हा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात प्रवेश घेतला. शाळेत प्रवेश घेतल्यानंतर आठवीपर्यंतची सर्व शालेय पुस्तके व गणवेश शासनामार्फत मोफत मिळाला. नववीपासून शालेय पुस्तके शासनाकडून मोफत मिळत नसल्याने घरी पोटाला खायचे की शाळा शिकायची, अशी अवस्था रामबाईची झाली. वडील हस्तरेखा पाहून भटकत राहिल्याने वर्षभर त्यांचा घरी पाय नसतो. आई देखील अशिक्षितच. रामबाई चार भावंडांपैकी सर्वात लहान तरी तिने अथक परिश्रम घेत नियमित शाळा केली.शिक्षकांनी शिकविले. ती नित्यनियमाने घरी अभ्यास करीत असे.
यंदा तिने दहावीची परीक्षा दिली व त्यात तिला ६१ टक्के गुण मिळाले. हे गुण कमी असले तरी समाजात पहिली विद्यार्थिनी मॅट्रिक पास होण्याचा इतिहास रामबाईने रचला आहे. रामबाईची प्रेरणा घेत अनेक नाथजोगी समाजातील लहान मुली आता शाळेत जात असल्याचे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा :

12 thफेल चित्रपट कथानकाची परळीत पुनरावृत्ती : बापाच्‍या पाठबळाने मुलगा ११व्‍या प्रयत्‍नात दहावी पास
संतापलेल्‍या मुलाने वडिलांची दहावीची मार्कशीट केली व्हायरल; अन्…
दहावीनंतर काय? …निर्णय घेताना!