राजगुरुनगरमधील ‘त्या’ कॅफेंचे वस्त्रहरण
राजगुरुनगर : Bharat Live News Media वृत्तसेवा : महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनींना मैत्रीच्या नावाखाली कॉफीची ऑफर करून आडोशाला गेल्यावर अश्लील चाळे करायला मिळणारे राजगुरुनगर शहरातील जवळपास 17 कॅफेंवर नगरपरिषद प्रशासनाने धडक कारवाई केली. पोलिसांच्या उपस्थितीत झालेल्या या कारवाईदरम्यान या कॅफेंमध्ये अनेक आक्षेपार्ह प्रकार, साहित्य आढळून
आले आहे.
मागील महिन्यात शहरातील दोन अल्पवयीन मुलींना दारू पाजून तसेच उत्तेजनावर्धक इंजेक्शन देऊन बलात्काराची घटना घडली होती. अल्पवयीन मुली आणि आरोपी असलेल्या मैत्री आणि त्यापुढील घृणास्पद प्रकार घडण्याला कॅफे हा राजाश्रय असल्याचे स्पष्ट वृत्त दै ’Bharat Live News Media’ने दि. 18 मे रोजी प्रसिद्ध केले होते. या पार्श्वभूमीवर आणि तालुक्यात घडलेल्या घटनांच्या संदर्भात माहिती घेऊन प्रशासनाने बुधवारी (दि. 29) धडक कारवाई केली.
नगरपरिषद, पोलिस प्रशासनाची संयुक्त मोहीम
नगरपरिषदेचे 60 अधिकारी, कर्मचारी तसेच दोन अधिकार्यांसह 17 पोलिस आणि होमगार्ड कर्मचारी यांच्या पथकाने कारवाई केली. पाबळ रोड, पुणे-नाशिक जुना महामार्ग परिसरात कारवाई करण्यात आली.
कारवाईची माहिती मिळताच बहुतेक कॅफेचालकांनी कुलूप लावून धूम ठोकली. मात्र कुलुपे तोडून अशी बंद कॅफे
उघडण्यात आली. अनेक कॅफेमध्ये डान्स बारप्रमाणे मंद आकर्षक लाईट, म्युझिक सिस्टिम पाहायला मिळाल्या. दोघांना म्हणजेच मुला-मुलींना बसता येईल अशी बैठक व्यवस्था अर्थात आडोसा अशी रचना पाहायला मिळाली. अनेक ठिकाणी आजूबाजूला बिअर, दारूच्या बाटल्या आणि वापरलेले कंडोम मिळून आले. कॅफेचे नाव आणि अल्पवयीन मुलांचा इश्काचा बाजार भरवण्याचे हे केंद्र पाहून अनेक पालकांना धडकी भरली.
बहुतांशी कॅफमध्ये लाकडी, प्लायवूडने तयार करण्यात आलेल्या आक्षेपार्ह बैठक व्यवस्था नगरपरिषदेच्या कर्मचार्यांनी तोडून काढल्या. मोडतोड केलेले साहित्य वाहनांमध्ये भरून पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले. या कारवाईचे शहर परिसरातील नागरिकांनी स्वागत केले आहे. कॅफेचालकांबरोबर जागामालकांवर देखील कडक कारवाई करावी, अशी मागणी शहरातून होत आहे.
13 कॅफे व 4 लॉजवर कारवाई : पोलिस निरीक्षक
शहरातील 13 कॅफेंवर आणि 4 लॉजवर कारवाई करण्यात आल्याची माहिती खेड पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी दिली. पत्रकार परिषदेत माहिती देताना केंद्रे म्हणाले, राजगुरुनगर नगरपरिषद व खेड पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी छापे टाकण्यात आले. कॅफेची तपासणी करून जे कॅफे विनापरवाना आहेत, अशा कॅफेमालकांवर 5 हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली. इतर कॅफेमालकांना इमारतीचा आराखडा बदली करून त्यामध्ये पार्टेशन टाकून छोटे-छोटे रूम तयार केल्याने कारणे दाखवा नोटीस देण्यात आली.
शहरातील एकूण 13 कॅफेचे ठिकाणी तपासणी करण्यात आली, तसेच पोलिस ठाणे हद्दीमधील एकूण 4 लॉजिंग-बोर्डिंगवर छापे टाकण्यात आले. तेथील रजिस्टर व ग्राहक यांचे ओळखपत्र घेतले अगर कसे? याबाबत तपासणी केली, तेव्हा रजिस्टर अपूर्ण असल्याचे व अनेक ग्राहकांकडून ओळखपत्र घेतले नसल्याचे आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावर जिल्हाधिकारी यांनी लॉजिंग बोर्डिंग अस्थापनेबाबत घालून दिलेल्या नियम, अटी व शर्थीचे उल्लंघन केले असल्याचे आढळून आल्याचे व त्यामुळे त्यांच्यावर भा.दं.वि कलम 188 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
लॉजिंगमध्ये मिळून आलेल्या ग्राहकांकडे विचारपूस केली असता ते एकमेकांच्या संमतीने लॉजिंगमध्ये आले असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना सोडून देण्यात आल्याचे निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी सांगितले.
हेही वाचा
pune porsche accident : पबच्या परवान्यांची झाडाझडती
कोल्हापूर : कुरुंदवाडमधील संभाव्य पूरग्रस्त भागाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
पतसंस्थेत सव्वादोन कोटींचा अपहार; तिघांवर गुन्हा