पळसदेवला ‘उजनी’त बेकायदेशीर जलवाहतूक; प्रशासन गाफील
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यात उजनी जलाशयात बोट बुडून 6 जण मृत्युमुखी पडल्याची घटना ताजी असतानाच तालुक्यातील पळसदेव (ता. इंदापूर) येथे बेकायदेशीर नौकानयन सुरू असल्याचे दिसून आले आहे. पळसदेवमध्ये एखादी बोट बुडून अनेकांचा जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार आणि त्यानंतर येथील बोटधारकांवर कारवाई करणार का? असा प्रश्न येथील सर्वसामान्य नागरिक व पर्यटकांमधून विचारला जात आहे.
पळसदेव येथील हेमाडपंती पळसनाथ मंदिर सध्या उजनी जलाशयात पाणी नसल्याने पाण्याबाहेर आले आहे, ते पाहण्यासाठी शेकडोंच्या संख्येने पर्यटक पळसदेवमध्ये येत आहेत. त्या पर्यटक प्रवाशांना बेकायदेशीर बोटीतून फिरवण्याचे काम येथील काही ठरावीक मच्छीमार व बाहेरचे लोक अगदी वादळी वार्यातही इमानेइतबारे काम करून पर्यटकांचा जीव धोक्यात घालून काही तासांतच हजारोंचा मलिदा गोळा करीत आहेत.
दुर्घटना घडण्याची दाट शक्यता
उजनी जलाशयातील पाणीसाठा पहिल्यांदाच कधी नव्हे एवढा या वर्षी कमी झालेला आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून गुडूप झालेली अनेक मंदिरे, राजवाडे, पूल पाण्यातून उघडे पडले आहेत. त्यातच शाळांना सुट्या लागलेल्या असल्याने अनेक पालक आपल्या मुलांसह सर्व कुटुंबांसहित पुरातन काळातील मंदिरे, वाड्यांना पाहण्यासाठी दररोज व विशेषत: शनिवार, रविवार आणि सोमवार असे तीन दिवस मोठ्या संख्येने येऊन मंदिर पाहण्याचा आनंद लुटत आहेत. मंदिर पाहण्यासाठी पळसदेव गावातून आल्यानंतर मासे पकडणार्या बोटीने नदीपात्रातून अलीकडे-पलीकडे सोडले जाते. जादा पैसे मिळवण्याच्या हेतूने अनेकदा स्पर्धा केली जाते. त्यातूनही होडीला मशिन असल्याने क्षणातच होडी सुसाट वेग घेते. यामुळे सकाळपासून सुटत असलेले वारे, बोटींचा वाढता वेग आणि बोटीत बसवलेले भरमसाट पर्यटक, यामुळे कोणत्याही क्षणी बोट बुडून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता अधिक आहे.
मध्यंतरी इंदापूर तालुक्यातील कळाशी या ठिकाणी असाच प्रकार घडून जवळपास सहा लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. हे अगदी ताजे उदाहरण समोर असतानाही महसूल व पोलिस यंत्रणा अतिशय गाफीलपणे हा सर्व प्रकार माहिती असतानाही मिळणार्या मलिद्यापुढे जाणीवपूर्वक डोळेझाक करीत आहे.
तक्रार आली, तरच कारवाई
या जीवघेण्या वाहतुकीसंदर्भात काही पर्यटकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला फोन करून माहिती दिल्यानंतरही कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. उलट तुम्ही एखादे लेखी निवेदन अथवा फोटो पाठवा, नंतर त्याच्यावर कारवाई करू, अशी उत्तरे देण्यात आली. तक्रार आली, तरच कारवाई करायची; अन्यथा दुधावरची साय ओरपत बसायची, अशी दुटप्पी भूमिका खालपासून वरपर्यंतचे अधिकारी करताना दिसत असल्याने येथील पर्यटकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
हेही वाचा
Nashik News | विभागीय महसुल आयुक्त गमे निवृत्त हाेणार; आयुक्तपदासाठी लॉबिंग
खळबळजनक! गॅस पाइपलाइन फुटली आणि जीव वाचवण्यासाठी नागरिकांची पळापळ झाली
खरिपात 148 लाख हेक्टरवर होणार पेरण्या! बियाण्यांची मुबलकता