अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षकांवर ठपका; वेगळे रक्ताचे नमुने घेतल्याचे निष्पन्न

अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षकांवर ठपका; वेगळे रक्ताचे नमुने घेतल्याचे निष्पन्न

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : ससूनमधील रक्ताचा नमुना फेरफार प्रकरणाची त्रिसदस्यीय समितीने मंगळवारी कसून चौकशी केली. अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी या प्रकरणाची वेळेत चौकशी करून शासनाला माहिती पुरवली नाही आणि वैद्यकीय अधीक्षकांनी वैद्यकीय कायदेशीर प्रकरणाची देखरेख केली नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. चौकशीतून समोर आलेल्या माहितीतून समितीच्या अहवालात अभिप्राय आणि शिफारसी यांची नोंद करण्यात आली आहे.

यामध्ये अधिष्ठाता यांनी प्रकरणाचे शासकीय व सामाजिक गांभीर्य ओळखून वेळेत चौकशी करून शासनास माहिती दिली असती आणि ससून रुग्णालय प्रशासनाकडून पोलिस तपासात अधिकचे सहकार्य झाले असते, तर ससून रुग्णालयाची आणि शासनाची प्रतिमा राखली गेली असती, असे अहवालात म्हटले आहे. डॉ. तावरे यांच्या सुटीच्या कालावधीत तफावत दिसून येत आहे. न्याय वैद्यकशास्त्र विभागाच्या 25 मे रोजीच्या  पत्रानुसार, डॉ. तावरे 2 ते 22 मे सुटीवर जाणार होते. मात्र, ते 21 मे रोजी कर्तव्यावर हजर झाले हे बायोमेट्रिक नोंदीवरून दिसून येते, असेही नमूद करण्यात आले आहे
एक महिला आणि दोन वयस्कर व्यक्तींचे नमुने
डॉ. श्रीहरी हाळनोर यांनी 19 मे रोजी तपासणी व रक्ताचे नमुने घेताना नियमांचे पालन केलेले नाही. त्यांनी रक्ताचे नमुने बदल करण्याच्या उद्देशाने महिला व दोन वयस्कर व्यक्ती यांचे रक्ताचे नमुने घेतले आहेत.
वैद्यकीय अधीक्षकांना याबाबत माहिती मिळाली कशी नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. संबंधित महिला ही अल्पवयीन आरोपीची आई असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
अहवालातील शिफारसी

अपघात विभागातील वैद्यकीय अधिकारी यांनी रक्ताचे नमुने घेणे, लेबल लावणे, सीलबंद करणे व पोलिसांच्या ताब्यात देणे हे व्यक्तिशः व स्वत:च्या देखरेखीखाल करणे अभिप्रेत आहे.
अपघात विभागातील आंतररुग्ण मेडिको लीगल केस आणि बाह्यरुग्ण एमएलसी असे दोन वेगवेगळे रजिस्टर एकत्र ठेवणे.
अमली पदार्थ सेवनाची शक्यता असलेल्या प्रकरणात रक्ताच्या नमुन्यासह लघवी तपासणी करणे. तरी याबाबतीत न्याय सहायक प्रयोगशाळा यांच्याशी सल्लामसलत करून विहित नमुने घेणे.
अधिष्ठाता यांनी ससून रुग्णालय व बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात माध्यम प्रतिनिधी यांना नियमाप्रमाणे माहिती देण्यासाठी नियुक्ती करून सुसूत्रता ठेवावी.

हेही वाचा

12 th result : बारावीच्या गुणपत्रिका सोमवारी मिळणार!
खरिपात 148 लाख हेक्टरवर होणार पेरण्या! बियाण्यांची मुबलकता
अपहरण करून मागितली एक कोटीची खंडणी