वैशाख वणवा पेटला; पाटण्यात उष्माघाताने कहर; ८० मुले बेशुद्ध

वैशाख वणवा पेटला; पाटण्यात उष्माघाताने कहर; ८० मुले बेशुद्ध

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : वैशाख वणवा दिल्लीत अक्षरश: पेटलेला आहे. दिल्लीच्या तापमानाने 100 वर्षांतील विक्रम मोडीत काढले आहेत. बुधवारी दिल्लीतील मंगेशपूर परिसरात दुपारचे तापमान 52.3 अंशांवर धडकले होते. राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणासह बिहारमध्येही उष्णतेची लाट कायम आहे. बिहारमधील पाटण्यात बुधवारी दुपारी उष्माघातामुळे वेगवेगळ्या घटनांत मिळून 80 शालेय विद्यार्थी बेशुद्ध पडल्याने एकच खळबळ उडाली!
वैशाखाच्या या तडाख्यात गारवा देणारी बातमी अशी की, मान्सून 24 तासांत केरळला धडकणार आहे. उत्तर भारतातील वैशाखाच्या या वणव्याला दक्षिण भारतातून गुरुवारी दिलासा मिळणार आहे. बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पारा बुधवारी 48 अंशांच्या जवळपास पोहोचला. आठ जिल्ह्यांतील 80 मुले कडक उन्हामुळे भोवळ येऊन पडली. भर रस्त्यावर, ऑटो रिक्षांमध्ये तसेच अनेक शाळांमध्येही अशा घटना घडल्या. मुलांना तातडीने रुग्णालयांत दाखल करण्यात आले. राज्यात गुरुवारपर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार आहे.
राजधानी दिल्लीत तर तापमानाने कहर केला. दुपारपर्यंत उन्हाचा तडाखा असह्य असाच होता. घराबाहेर पडायलाही कुणी धजत नव्हते. पारा 52 अंशांच्या पुढे सरकल्यानंतर काही वेळाने काही ठिकाणी झालेल्या पावसाने काहीसा दिलासा दिला.
दिल्लीत पाणीटंचाई
दिल्लीत पाणीटंचाईचे संकटही गडद बनले आहे. या पार्श्वभूमीवर केजरीवाल सरकारने पाईपने गाड्या धुणार्‍यांना 2 हजार रुपये दंड आकारण्याचे निर्देश दिले आहेत. पाण्याच्या अपव्ययावर लक्ष ठेवण्यासाठी 200 जणांचे पथक नेमले आहे.
दिल्लीनंतर चुरू सर्वात उष्ण शहर
दिल्लीनंतर राजस्थानातील चुरू हे जिल्ह्याचे शहर देशातील दुसरे सर्वाधिक उष्ण शहर ठरले. चुरूत 50.5 अंश तापमान होते. राजस्थानमध्ये उष्म्यामुळे आठवडाभरात 55 जणांचा मृत्यू झाला आहे.
उत्तरेत उष्णतेचा ‘रेड अलर्ट’
पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमध्ये उष्णतेच्या लाटेचा ‘रेड अलर्ट’ जारी होता.
ईशान्येत शनिवारपर्यंत
पावसाचा ‘रेड अलर्ट’
बंगालमध्ये 26 मे रोजी धडकलेल्या रेमल चक्रीवादळाचा प्रभाव आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये कायम आहे. येथे 1 जूनपर्यंत पावसाचा ‘रेड अलर्ट’ जारी आहे.
राजस्थानातील फलोदीसह हरियाणाच्या सिरसामध्ये बुधवारी 51 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
वीज मागणीचाही उच्चांक
दिल्लीतील तापमानवाढीचा परिणाम विजेच्या वापर आणि मागणीवर होत आहे. गेल्या 12 दिवसांपासून विजेची मागणी 7 हजार मेगावॅटपेक्षा जास्त आहे. बुधवारी तापमानाबरोबर विजेच्या मागणीनेही उच्चांकी पातळी गाठली. मागणी 8,302 मेगावॅटवर पोहोचली. दिल्लीच्या इतिहासातील ही सर्वाधिक वीज मागणी आहे.

Go to Source