चंद्रपूर : ताडोबात वाघिणीला अडविल्याप्रकरणी वनमंत्र्यांकडून दखल

चंद्रपूर : ताडोबात वाघिणीला अडविल्याप्रकरणी वनमंत्र्यांकडून दखल

चंद्रपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सफारी दरम्यान एका वाघिणीच्या भ्रमणमार्गावर अडथळा निर्माण केल्याची घटना घडली. या घटनेनंतर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने दहा जिप्सींसह मार्गदर्शकावर महिनाभरासाठी निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच हंगामी पर्यटन वाहन चालकांवर कायमची बंदी घालण्यात आली आहे. या घटनेची दखल वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली असून ते ताडोबात जाऊन या प्रकरणाचा आढावा घेणार आहेत.
१७ मे रोजी कोअर झोनमध्ये सकाळी खातोडा ते ताडोबा मार्गावर एका क्रुझरसह दहा जिप्सी वाहनांनी पर्यटकांना घेऊन सफारी केली. या दरम्यान एक वाघीन भ्रमण करत असताना जिप्सीं चालकांनी तिचा मार्ग अडवून अडथळा निर्माण केला. आणि पर्यटनाचा आनंद लुटला. दरम्यान माध्यमांनी या प्रकरणाची दखल घेतल्यानंतर रविवारी (दि.२७) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला. वाघिणीच्या मार्गावर अडथळा निर्माण करण्यात येऊन व्याघ्र प्रकल्पाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिप्सी, वाहन चालक व मार्गदर्शकांवर कारवाई करण्यात आली. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही या प्रकरणाची दखल घेतली असून ताडोबात वाघिणीच्या मार्गक्रमणात अडथळा निर्माण केल्याची घटना गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. ही घटना जिवाशी खेळण्याचा प्रकार असून असे प्रकार घडले, तर ताडोबात जिप्सी कमी होतील आणि त्याचा पर्यटनावर परिणाम होईल, असेही ते म्हणाले.
हेही वाचा :

चंद्रपूर : ताडोबात वाघिणीच्या भ्रमणमार्गात अडथळा; १० जिप्सी महिनाभरासाठी निलंबित
चंद्रपूर : ताडोबात दोन वाघिणी एकमेकांना भिडल्या; व्हिडिओ व्हायरल
चंद्रपूर: ताडोबात आढळले ५५ वाघ, १७ बिबट, ६५ अस्वल