राज्याच्या सहकार आयुक्तपदी दिपक तावरे यांची नियुक्ती
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्याच्या रिक्त असलेल्या सहकार आयुक्तपदी भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी दिपक तावरे यांच्या नियुक्तीचे आदेश शासनाने सोमवारी जारी केले आहेत. तत्कालीन सहकार आयुक्त अनिल कवडे हे सेवानिवृत्त झाल्यानंतर सहकार आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार सहकार विभागातील ज्येष्ठ अधिकारी व सहकारचे अपर आयुक्त शैलेश कोतमिरे यांच्याकडे देण्यात आला होता. आता तावरे यांच्या नियुक्तीने सहकार आयुक्तपदी पूर्णवेळ अधिकारी मिळाल्याने कामकाजास गती येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
देशात सहकार क्षेत्रात महाराष्ट्र राज्य अग्रस्थानी असून सहकार आयुक्तपद रिक्त राहणे योग्य नव्हते. त्यादृष्टिने प्रशासकीय पातळीवरही सातत्याने चर्चा होत होती. तावरे यांच्या राज्य वखार महामंडळाच्या अध्यक्ष पदावरुन मुंबई येथे राज्य कामगार विमा योजना येथे आयुक्तपदी बदली झाली होती. त्यानंतर पुण्यात यशदाच्या उप महासंचालक पदी बदली झाली होती. या दोन्ही पदांवर ते रुजू झाले नव्हते. आता शासनाने त्यांची नियुक्ती सोमवारी (दि.27) सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, पुणे या रिक्त पदावर केलेली आहे. हे पद कनिष्ठ प्रशासकीय श्रेणीत अवनत करुन ही नियुक्ती केल्याचे आदेश शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे यांनी काढले आहेत.
दरम्यान, तावरे हे मूळ सहकार विभागातील ज्येष्ठ अधिकारी आहेत. त्यांनी सहकार विभागात यापुर्वी विविध पदे भूषविली आहेत. पुणे विभागीय सह निबंधक, साखर सह संचालक या पदावर त्यांनी काम केले आहे. भारतीय प्रशासन सेवेत नियुक्त झाल्यानंतर प्रथम त्यांची राज्याच्या पणन संचालक पदी नियुक्ती झाली होती. सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पदही त्यांनी भूषविले. त्या नंतर त्यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून झाली. त्यांच्या कारकिर्दीत महामंडळाने समृध्दी महामार्गावर लॉजिस्टिक पार्कचा महत्वाकांक्षी प्रकल्प राबविला आहे.
हेही वाचा
अल्पवयीन मुलीचे अपहरण करणार्यास अटक : खामगाव टेकमधील मुलीची सुटका
खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी : हडपसर-सासवड रस्त्यावरील चित्र
विद्येच्या प्रांगणात धुँआ! विद्यापीठ प्रशासनाचे कारवाईकडे दुर्लक्ष