कुकर्मांची फळे

कुकर्मांची फळे

असे म्हणतात की, आजोबांचे मुलापेक्षा नातवावर जास्त प्रेम असते. दुधापेक्षा दुधावर आलेली साय जास्त चांगली वाटते. माया पुढे ओढत असते, असेही म्हटले जाते. या बाबतीत आमचा विचार थोडा वेगळा आहे. एकाच घरात आजोबा, मुलगा आणि नातू अशा तीन पिढ्या नांदत असतील तर आजोबांचे नातवावर जास्त लक्ष असते आणि त्याच्यावर जास्त प्रेम असते, हा सर्वसामान्य रीतिरिवाज आहे. आपले ‘धड’ निघाले नाही, निदान पोराचे तरी पोर ‘धड’ निघावे यासाठी आजोबा त्याला जीवापाड जपत असतात. अशाच दोन नातवंडांमुळे संत्रस्त झालेले दोन आजोबा सध्या देशात आहेत. त्यापैकी एक आहेत माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आणि दुसरे आहेत पुणे येथील ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात गाजत असलेले सुरेंद्र अगरवाल नावाचे आजोबा.
माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या चिरंजीवाचे नाव आहे रेवण्णा. हे पण आमदार-खासदार राहिलेले आहेत. रेवण्णा यांच्या चिरंजीवाचे नाव आहे प्रज्वल. सदरील उडाणटप्पू प्रज्वल याने नुकतीच जनता दलाच्या तिकिटावर लोकसभा निवडणूकही लढवली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रज्वल याचा रंगीबेरंगी इतिहास राजकीय पक्षांना माहीत होता. अर्थात, तो तसा त्याचे वडील आणि आजोबा यांनाही माहीत असणार. श्रीमान प्रज्वल याच्या घरातील मोलकरणीवर आणि तिच्या मुलीवरही त्याने अत्याचार केले. सहनशीलतीची परिसीमा गाठल्यानंतर या मोलकरणीने प्रज्वल याची पोलिसांमध्ये तक्रार दिली. या तक्रारीपाठोपाठ असंख्य स्त्रियांनी प्रज्वल याने केलेल्या कुकर्मांची कहाणी सांगण्यास सुरुवात केली.
दुसरे आजोबा आहेत श्रीमान सुरेंद्र अगरवाल. अगरवाल बिल्डर्स या साम्राज्याचा पाया रचणारे हेच ते अगरवाल. यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे रेकॉर्ड उपलब्ध आहे. सुरेंद्र अगरवाल यांचे चिरंजीव विशाल अगरवाल आणि विशाल अग्रवाल यांचा चिरंजीव म्हणजे तोच, ज्याने 200 च्या वेगाने पोर्श गाडी चालवत दोन निष्पाप जीवांना उडवले तो वेदांत अगरवाल. इथेही घटना घडल्याबरोबर सुरेंद्र अगरवाल अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आणि त्यांनी कोर्टासमोर ‘नातवाची चूक झाली आहे. मी त्याच्यावर संस्कार करीन. कृपया त्याला माफ करावे,’ अशी विनंती केली आणि निबंध लिहिण्याची शिक्षा देऊन कोर्टानेही त्याला माफ केले, म्हणजे त्याला जमानत बहाल केली. स्वतः सुरेंद्र यांचे रेकॉर्ड चांगले नाही.
त्यांचे चिरंजीव राजेश यांचा पूर्वेतिहास काळ्या शाईने भरलेला आहे. चिरंजीव वेदांत याचेही पराक्रम शालेय वयापासून गाजलेले आहेत. नातवावर संस्कार करीन, असे म्हणणारे सुरेंद्र यांनी नातू सतरा वर्षे आठ महिन्यांचा होईपर्यंत काय केले, हे समजण्याचा मार्ग नाही. आजोबा बर्‍यापैकी थकले असले तरी आजही काही ना काहीतरी मॅनेज करून किंवा करोडो रुपये खर्च करून आपल्या मुलाला आणि नातवाला या गंभीर प्रकरणातून सोडवण्याची उमेद बाळगून आहेत. देशातील तमाम आजोबांनी सुरेंद्र यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. कितीही गंभीर गुन्हा असला, तरी आपल्या बाळाला वाचवले पाहिजे हे त्यांनी संपूर्ण देशाला शिकवले आहे. दोन निष्पाप जीवांचा बळी घेणार्‍या नातवाला जेलमध्ये टाका आणि त्याच्या गुन्ह्याची त्याला शिक्षा द्या, असे हे आजोबा कधीही म्हणालेले नाहीत. नातू निष्पाप आहे, त्याला एकदा माफ करा, असाच त्यांचा स्वर आहे.