ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत नवे बदल, जाणून घ्या त्याविषयी
ज्येष्ठ नागरिक बचत योजना (एससीएसएस) ही सरकार पुरस्कृत बचत योजना असून, त्यात मुद्दल आणि व्याजाला सरकारकडून संंरक्षण दिले जाते. या योजनेसाठी पोस्ट ऑफिस बँकेत खाते सुरू करता येते. 60 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाची व्यक्ती किंवा ज्यांचे वय 55 वर्षे किंवा त्याहून अधिक; परंतु 60 पेक्षा कमी आहे आणि तो सेवानिवृत्त झाला असेल किंवा खाते सुरू करण्याच्या तारखेला पात्र असणारा व्यक्ती हा ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचे खाते सुरू करू शकतो.
आजघडीला ऑनलाईनवरही ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचे खाते सुरू करता येऊ शकते. शिवाय निवृत्तीनंतर एक महिन्याच्या आत गुंतवणूक करत असेल, तर त्याच्या गुंतवणुकीचा कालावधी पाच वर्षांचा असतो. मात्र त्याचा मॅच्योरिटी पिरीयड हा तीन वर्षांपर्यंत वाढवू शकता. आता या नियमात नव्याने बदल करण्यात आले आहेत. एक महिन्याच्याऐवजी तीन महिन्यांचा कालावधी दिला आहे.
गुंतवणुकीची रक्कम
किमान एक हजार आणि कमाल 30 लाख रुपयांची गुंतवणूक करत खाते सुरू करता येते. ते एकल आणि संयुक्त खाते म्हणून सुरू करता येते. ‘एससीएसएस’ योजनेवर सध्या 8.2 टक्के वार्षिक व्याजदर दिला जात आहे. दर तीन महिन्याला व्याजदराचा आढावा घेतला जातो. महागाई, बाजाराची स्थिती आणि अन्य घटकांचा विचार करून दर निश्चित केला जातो.
एससीएसएसवर करसवलत
भारत सरकारची बचत योजना असल्याने यात पैसे बुडण्याची शक्यता नसतेच. ही योजना पाच वर्षांची असते आणि त्यास आपण तीन वर्षांची मुदतवाढ देऊ शकतो. म्हणजेच आठ वर्षांसाठी या योजनेवर भरभक्कम व्याज मिळवू शकता. याशिवाय करसवलतीचा लाभही मिळतो. प्राप्तिकर कलम ‘80 सी’नुसार दीड लाखांपर्यंत करसवलत मिळवू शकतो.
योजनेतील नवीन बदल
7 नोव्हेंबर 2023 रोजी अर्थमंत्रालयाने अधिसूचना काढली असून, या योजनेत अनेक बदल केले आहेत. या योजनेतील ताज्या बदलांमध्ये मृत सरकारी कर्मचार्याच्या जोडीदाराला खाते उघडण्याची परवानगी देणे, खाते उघडण्याची मुदत वाढवणे, खातेधारकांना त्यांचे खाते आणखी तीन वर्षांसाठी वाढविण्याची परवानगी देणे आणि मुदतवाढीला लागू होणारे व्याजदर बदलणे यांचा समावेश आहे.
सरकारी कर्मचार्याच्या जोडीदाराची गुंतवणूक
सेवेत असताना एखाद्या कर्मचार्याचा मृत्यू झाला असेल, तर त्याच्या जोडीदाराकडून एससीएसएस योजनेतील गुंतवणूक करण्यासंदर्भात नियमात शिथिलता आणली आहे. नव्या नियमानुसार, सरकारी कर्मचार्याच्या जोडीदाराला काही नियमांसह एससीएसएसमध्ये गुंतवणूक करण्याची मुभा असेल. ज्या कर्मचार्याचे वय 50 पेक्षा अधिक असेल आणि त्याचा सेवेत असताना मृत्यू झाला असेल, तर अशा कर्मचार्याच्या जोडीदाराला या योजनेत सहभागी होता येईल. या योजनेसाठी केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचारी पात्र असतील. तसेच या योजनेनुसार, सेवानिवृत्तीचा लाभ मिळण्यास आणि मृत्यूपश्चात भरपाई मिळण्यासाठी कुटुंब पात्र असेल.
मुदतवाढीचा नियम शिथिल
एखाद्या खातेधारकाला योजना परिपक्व झाल्यानंतर, एक वर्षाच्या आत किंवा तीन वर्षांची मुदतवाढ पूर्ण झाल्याच्या तारखेनंतर फॉर्म-4 भरून पुन्हा तीन वर्षांसाठी गुंतवणूक योजनेला मुदतवाढ देता येऊ शकेल. यापूर्वी ही सुविधा केवळ एकदाच वापरता येऊ शकत होती.
विद्यमान स्थितीतला व्याजदर लागू
नव्या बदलानुसार ठेवींवर विद्यमान व्याजदर लागू केला जाणार आहे. म्हणजेच एखाद्या योजनेची मुदत पूर्ण झाली असेल आणि त्यास मुदतवाढ दिली गेली असेल, तर मॅच्योरिटी तारखेला असणारा नवा व्याजदर लागू राहील किंवा मागील मुदतवाढ दिलेल्या तारखेचा व्याजदर आकारला जाईल. यापूर्वी सुरुवातीचाच व्याजदर पुढेही आकारला जात असे. यापूर्वी एकदाच मुदतवाढ करण्यास परवानगी असायची. आता योजनेला कितीदाही मुदतवाढ देता येणे शक्य असून, यानुसार नव्या व्याजदर आकारणीचा लाभ लाभार्थ्यांना मिळणार आहे.
दंडाची आकारणी
वाढवलेल्या कालावधीच्या तारखेपासून एक वर्ष संपण्याच्या अगोदर खाते बंद केले, तर खात्यात जमा असलेल्या रकमेवर आकारल्या जाणार्या व्याजात एक टक्का कपात होईल आणि उर्वरित रक्कम खातेधारकाला सुपुर्द केली जाईल.
अर्थसंकल्पातून काय बदल केले?
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतील कमाल गुंतवणूक ही 15 लाखांवरून 30 लाख रुपये केली आहे आणि ती 1 एप्रिल 2023 पासून लागू केली आहे.
मुदतपूर्व बंद करण्याचे नियम
खाते सुरू केल्यानंतर एक वर्षाच्या आत ही योजना बंद केली जात असेल, तर या पैशावर दिलेल्या व्याजातून दंड वसूल केला जाईल. उर्वरित रक्कम ही खातेदाराच्या नावावर जमा केली जाईल. जर एखादे खाते वर्षानंतर बंद केले जात असेल आणि खाते सुरू करण्यापासून दोन वर्षांच्या आत बंद केले असेल, तर या निधीवर दीड टक्के दराने दंड आकारून रक्कम कापून घेतली जाईल. खाते सुरू केल्यानंतर दोन वर्षे झाली असतील किंवा त्यानंतर बंद केले जात असेल, तर त्यावर एक टक्के रक्कम कपात केली जाईल.
निवृत्तीनंतर गुंतवणूक करण्यासाठी आणखी वेळ
सेवानिवृत्त झाल्यानंतर तीन महिन्यांपर्यंत ‘एससीएसएस’चे खाते सुरू करता येऊ शकते. याशिवाय सेवेत असताना खातेधारक कर्मचार्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयाला आर्थिक मदत मिळू शकते. यापूर्वी खाते सुरू करण्याची मुदत एक महिन्याची होती आणि तीही केवळ निवृत्त कर्मचार्यांसाठीच.
The post ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत नवे बदल, जाणून घ्या त्याविषयी appeared first on पुढारी.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना (एससीएसएस) ही सरकार पुरस्कृत बचत योजना असून, त्यात मुद्दल आणि व्याजाला सरकारकडून संंरक्षण दिले जाते. या योजनेसाठी पोस्ट ऑफिस बँकेत खाते सुरू करता येते. 60 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाची व्यक्ती किंवा ज्यांचे वय 55 वर्षे किंवा त्याहून अधिक; परंतु 60 पेक्षा कमी आहे आणि तो सेवानिवृत्त झाला असेल किंवा खाते …
The post ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत नवे बदल, जाणून घ्या त्याविषयी appeared first on पुढारी.