तेलंगणातही पंतप्रधान मोदीच ठरले भाजपचा चेहरा
नवी दिल्ली/हैदराबाद, वृत्तसंस्था : तेलंगणा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकापाठोपाठ सभा घेतल्या. यादरम्यान वेळ काढून ते तिरुमलालाही गेले. पाठोपाठ सभा आणि बालाजीचे दर्शन, याचा अन्वयार्थ सध्या काढला जातो आहे.
तेलंगणा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवसही पंतप्रधान मोदींनी कारणी लावला. पंतप्रधान मोदीच नव्हे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अध्यक्ष जे. पी. नड्डा, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा अशी पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांच्या सभांचा भर तेलंगणातून होता. काँग्रेसनेही संपूर्ण ताकद तेलंगणात पणाला लावली. सत्ताधारी बीआरएसचे नेते केसीआर यांचे संपूर्ण कुटुंब प्रचारात रंगलेले होते. काँग्रेसकडूनही राहुल गांधी, प्रियांका गांधी यांचे भरगच्च कार्यक्रम झाले.
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडप्रमाणेच तेलंगणातही भाजपने मुख्यमंत्री म्हणून कुणी विशिष्ट चेहरा मैदानात उतरविला नव्हता. कमळ हाच भाजपचा चेहरा, असे भाजपकडून सांगण्यात आलेले असले तरीही पंतप्रधान मोदी हेच प्रत्येक राज्यात भाजपचा मुख्य चेहरा म्हणून मोहिमेचे नेतृत्व करताना दिसले. तेलंगणात बीआरएसची मुख्य स्पर्धक काँग्रेस असे चित्र असताना पंतप्रधान मोदींनी ते पालटून टाकले.
प्रचार संपुष्टात येण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी सभा घेतल्या. काँग्रेस, बीआरएस आणि मुख्यमंत्री केसीआर यांना आपल्या भाषणांतून फैलावर घेतले. राजस्थानात कट्टरवाद्यांकडून करण्यात आलेली कन्हैयालाल यांची हत्या, सणासुदीच्या मिरवणुकांवरील दगडफेक हे पंतप्रधानांचे मुद्दे होते. ते त्यांनी छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील निवडणुकांतूनही जनतेसमोर आणले. तेलंगणातून तिरुमलाला जाऊन पारंपरिक वेषभूषेत पंतप्रधानांनी घेतलेले बालाजीचे दर्शन हे तेलंगणातही प्रखर राष्ट्रवादाचे बिजारोपण मानले जाते.
हैदराबादचे भाग्यनगर, मेहबूबनगरचे पलामुरू
पंतप्रधान मोदींनी ज्या दिवशी तिरुमलाला (आंध्र प्रदेश) जाऊन बालाजीचे दर्शन घेतले, त्याच दिवशी यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हैदराबादचे नाव भाग्यनगर, तर मेहबूबनगरचे नाव पलामुरू केले जाईल, असे आश्वासन तेलंगणातील जाहीर सभेतून जनतेला दिले होते, हे येथे महत्त्वाचे!
गावोगावी शिवाजी महाराजांचे पुतळे
दोन वर्षांपूर्वी तेलंगणातील गावागावांतून छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे बसविण्याची मोहीमही त्याचाच एक भाग असल्याचे सांगण्यात येते. तेलंगणात विधानसभा निवडणुकीतील भाजपचा धुवाँधार प्रचार हा दोन उद्दिष्टे ठरवून आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठीची देखील ही तयारी आहे.
The post तेलंगणातही पंतप्रधान मोदीच ठरले भाजपचा चेहरा appeared first on पुढारी.
नवी दिल्ली/हैदराबाद, वृत्तसंस्था : तेलंगणा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकापाठोपाठ सभा घेतल्या. यादरम्यान वेळ काढून ते तिरुमलालाही गेले. पाठोपाठ सभा आणि बालाजीचे दर्शन, याचा अन्वयार्थ सध्या काढला जातो आहे. तेलंगणा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवसही पंतप्रधान मोदींनी कारणी लावला. पंतप्रधान मोदीच नव्हे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अध्यक्ष जे. पी. नड्डा, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, …
The post तेलंगणातही पंतप्रधान मोदीच ठरले भाजपचा चेहरा appeared first on पुढारी.