‘ई-संजीवनी’ योजना : ५ हजार ४७२ रुग्णांनी घेतले ऑनलाईन मोफत उपचार

‘ई-संजीवनी’ योजना : ५ हजार ४७२ रुग्णांनी घेतले ऑनलाईन मोफत उपचार

नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अवकाळी पाऊस, दमट वातावरण अशा विविध कारणांमुळे प्रकृतीच्या तक्रारी वाढल्या आहेत. डोकेदुखी, मळमळ, सर्दी, उलटी किंवा पोटदुखी आदी त्रास जाणवत असेल. तर ई-संजीवनी योजनेअंतर्गत ऑनलाइन ओपीडीच्या माध्यमातून घरच्या घरी मोफत सल्ला मिळतो. जिल्ह्यात मागील वर्षभरात जवळपास ५४७२ वर रुग्णांनी ऑनलाइन ओपीडीच्या माध्यमातून घरच्या घरी डॉक्टरांचा मोफत सल्ला घेतला आहे.
राष्ट्रीय टेलिकन्सल्टेशन सेवेद्वारे ई-संजीवनी योजनेच्या माध्यमातून कोविड काळापासून ही ऑनलाइन ओपीडी सेवा सुरू झाली. यासाठी वेबसाइट किंवा अ‍ॅपवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. या पोर्टलवर किंवा अ‍ॅपचा उपयोग करून ऑनलाइन उपलब्ध डॉक्टरांशी ऑडिओ-व्हिडिओद्वारे सल्लामसलत करून रुग्ण विनामूल्य सल्ला घेऊ शकतात.
ई- संजीवनी ओपीडी मार्फत दंतरोग, त्वचा रोग, शल्यचिकित्सा, मानसिक रोग, मेडिसीन, बालरोग, स्त्रीरोग, नेत्रचिकित्सा, अस्थिरोग आदी तसेच आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी सुविधा दररोज सकाळी ९ ते दुपारी १ व दुपारी १.४५ ते ५ वाजेपर्यंत सुरू असते. सध्या उन्हाळा व पुढे पावसाळा आहे. अशावेळी उन्हामध्ये किंवा पावसामध्ये आजारी असताना पुन्हा रुग्णालयात भिजत जाण्यापेक्षा या सुविधेच्या माध्यमातूनही रुग्ण आरोग्याचा सल्ला घेऊन डॉक्टरांच्या माहितीनुसार औषधोपचार घेऊन घरीच ठणठणीत बरे होऊ शकतात. त्यामुळे या सुविधेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गेहलोत यांनी केले आहे.
तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत सल्ला
एमबीबीएस, एमडी, एमएस, आयुर्वेदिक आदी तज्ज्ञ डॉक्टरच्या उपलब्धतेनुसार रुग्णांना आजारासंदर्भात हा ऑनलाइन वैद्यकीय सल्ला मिळतो. संबंधित डॉक्टर ऑनलाइन औषधांचे प्रिस्क्रीप्शनही देतात.
बॉक्ससाठी..
नोंदणी कशी करणार?
मोबाइलवर गुगल प्ले स्टोअरवरून ई-सजीवनी अ‍ॅप डाउनलोड करा, हे अ‍ॅप वापरण्यासाठी फोन नंबर लागेल, यामध्ये लॉगिनसाठी काही महत्त्वाची माहिती भरावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला पेशंट रजिस्ट्रेशन / जनरेट टोकन, पेशंट लॉगिन आणि पेशंट प्रोफाइल इत्यादी पर्याय दिसतील. रुग्णांची नोंदणी, टोकन निर्मिती, व्यवस्थापन, वैद्यकीय कर्मचा-यांशी डॉक्टरांशी ऑडिओ -व्हिडीओ सल्लामसलत, ई-उपचार, एसएमस ई-मेल नोटिफिकेशन, डॉक्टरांद्वारे मोफत सेवा, सर्व माहिती (दैनंदिन स्लॉट, डॉक्टर्स, रुग्णालय यांची संख्या, प्रतीक्षा कक्षाची माहिती, कन्सल्टेशन टाइम लिमिट आदी) महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये यात आहेत. विशेष म्हणजे ई-संजीवनी ओपीडीद्वारे राज्य, जिल्हा, गाव इत्यादी कोणत्याही ठिकाणावरून वैद्यकीय अधिका-यांकडून वैद्यकीय सल्ला व उपचार घेऊ शकतात. हा सल्ला व उपचार घेण्यासाठी मोबाइल, लॅपटॉप, संगणक याद्वारे थेट व्हिडीओ कॉल तसेच ई-मेल, एसएमएसद्वारे देखील वैद्यकीय अधिका-यांशी सल्लामसत करता येऊ शकते.
हेही वाचा 

पुणे-नागपूर विशेष रेल्वेला ‘लेट मार्क’; पुणे स्थानकावर प्रवासी ताटकळले
नागपूर: मध्यवर्ती कारागृहात कैद्याचा मृत्यू
नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पात बिबट्या मांजराचे दर्शन