कोल्हापूर जिल्ह्यात 5 लाख 76 हजार जणांना ‘हाय बीपी’

कोल्हापूर जिल्ह्यात 5 लाख 76 हजार जणांना ‘हाय बीपी’

आशिष शिंदे

कोल्हापूर : बदलती जीवनशैली, असंतुलित आहार, व्यायामाच्या अभावामुळे उच्च रक्तदाबाचा विळखा कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांभोवती घट्ट होत चालला आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या एका अहवालानुसार जिल्ह्यातीत 30 वर्षांवरील 5 लाख 76 हजार जणांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. उच्च रक्तदाबामुळे गंभीर हृदयविकार, मेंदूविकार आणि किडनीविकार होण्याचा धोक असून, गेल्या तीन वर्षांत या आजारांमुळे 2 हजार 551 जणांचा मृत्यू झाला आहे.
उच्च रक्तदाब जागतिक पातळीवर गंभीर विषय बनला आहे. उच्च रक्तदाबाकडे दुर्लक्ष केल्याने गंभीर स्वरूपाचा हृदयविकार, मूत्रपिंडविकार व पक्षाघातासारखे आजार होण्याचा धोका वाढतो. गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यात 2 हजार 165 जणांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. 287 जणांचा पक्षाघाताने, तर 99 जणांचा मूत्रपिंडाच्या आजाराने मृत्यू झाला.
ही लक्षणे दिसू शकतात
जगातील सुमारे 46 टक्के नागरिकांना आपल्याला उच्च रक्तदाब असल्याचे माहीत नाही. उच्च रक्तदाबाची कोणतीही लक्षणे नाहीत. यामुळेच उच्च रक्तदाबाला सायलंट किलर म्हणतात; मात्र ज्यांचा रक्तदाब 180/120 किंवा त्यापेक्षा अधिक आहे, अशांना तीव्र डोकेदुखी, छातीत दुखणे, चक्कर येणे, श्वास घेण्यात अडचण, मळमळ, उलट्या, अंधुक द़ृष्टी, गोंधळ, कानात गुंजणे, नाकातून रक्त येणे अशी लक्षणे दिसू शकतात.
उच्च रक्तदाब नियंत्रणासाठी हे करावे
‘तुमचा रक्तदाब अचूकपणे मोजा, त्यावर नियंत्रण ठेवा, दीर्घकाळ जगा’ ही यंदाच्या जागतिक आरोग्य उच्च रक्तदाब दिनाची थीम आहे. उच्च रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी संतुलित व कमी मीठयुक्त आहार, वजन कमी व नियंत्रणात, नियमित व्यायाम, तंबाखू व मद्यपान सेवण टाळणे गरजेचे आहे.