भाजपसोबत आलेल्यांना ‘क्लीन चिट’ देण्याचा करार केला नाही : देवेंद्र फडणवीस

भाजपसोबत आलेल्यांना ‘क्लीन चिट’ देण्याचा करार केला नाही : देवेंद्र फडणवीस

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : आमच्या आघाडीतील साथीदारांवर काही आरोप असू शकतात; परंतु ‘क्लीन चिट’ देण्यासाठी आम्ही त्यांच्याशी कोणताही करार केलेला नाही. तपास यंत्रणांना या आरोपांविषयी योग्य वाटेल तोच निर्णय त्या यंत्रणा घेतील. त्यामुळे इतर पक्षांतील भ्रष्टाचारी नेत्यांसाठी भाजप वॉशिंग मशिन आहे, हा चुकीच्या प्रचार करण्यात येत आहे, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
एका इंग्रजी डिजिटल माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना फडणवीस यांनी भाजपवर होत असलेल्या वॉशिंग मशिनच्या आरोपाला स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. फडणवीस म्हणाले की, इतर पक्ष आमच्यासोबत युती करत आहेत, हे आम्ही नाकारत नाही. मात्र, आम्ही त्यांच्याशी कोणताही करार केलेला नाही. हे राजकारण आहे. राजकीयद़ृष्ट्या ज्या क्षणी तुमच्याकडे पर्याय नसतो किंवा लोक तुमच्याशी अप्रामाणिक असतात, तेव्हा तुम्हाला उत्तर द्यावेच लागते. त्यामुळे आम्ही इतर पक्षांसोबत मोठी आघाडी करण्याचा प्रयत्न केला आहे. हे शक्य आहे की, आमच्या आघाडीतील साथीदारांवर काही आरोप असू शकतात; परंतु ‘क्लीन चिट’ देण्यासाठी आम्ही त्यांच्याशी
कोणताही करार केलेला नाही. तपास यंत्रणांना या आरोपांविषयी योग्य वाटेल तोच निर्णय तपास यंत्रणा घेतील. इतर पक्षांतील भ्रष्टाचारी नेत्यांसाठी भाजप वॉशिंग मशिन आहे, हा आरोपच चुकीचा आहे.
फडणवीस पुढे म्हणाले की, भूतकाळात भ्रष्टाचाराचे आरोप असलेले आणि नंतर भाजपमध्ये प्रवेश केलेले, एकमेव नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आहेत. फक्त अशोक चव्हाण आमच्या पक्षात आले. मात्र, इतर प्रकरणांमध्ये इतर पक्ष आमच्यासोबत आघाडीत सामील झाले आहेत. आम्ही त्यांच्या पक्षातील कोणालाही भाजपमध्ये घेतलेले नाही.