जळगाव-रावेर लोकसभा मतदारसंघात आचार संहितेचे सात गुन्हे दाखल
जळगाव, Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर आचार संहितेच्या काळात जळगांव जिल्ह्यात विविध प्रकरणांमध्ये 07 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी 03 तर मद्यप्राशन करुन धुमाकूळ घातल्या प्रकरणी 01 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनाधिकृतपणे बंदी असलेला गुटखा आणी मद्याची वाहतूक केल्या प्रकरणी 07 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कालवधीत 08 लक्ष 65 हजार 100 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. तर 05 लक्ष 19 हजार 787 रुपयांचा इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या कालावधीत आचार संहिता भंग तसेच निवडणूकीवर परिणाम करू शकतील असे अवैध प्रकार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध पथके नेमण्यात आली होती. या पथकांनी जिल्हाभरात मोठी कामगिरी केली आहे. जामनेर येथे विनापरवानगी प्रचार सभा घेतल्या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यासोबतच अवैधपणे गांज्याची वाहतूक, प्रतिबंध असलेल्या गुटख्याची वाहतूक तसेच अवैधरित्या मद्याचे वाहतूक, निवडणूकी विषयी विनाकारण अफवा पसरविणे, मद्य प्राशन करुन निवडणूक कर्मचाऱ्यांशी अरेरावी करणे तसेच ईव्हीएम मशिन्सचे प्रात्यक्षिक सुरु असतांना विनापरवानगी छायाचित्र काढणे याबाबतीत जिल्ह्यातील जामनेर, अमळनेर, भडगांव, पाचोरा, पहूर, जळगांव तालुका, पारोळा, मलकापुर या पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्याबरोबरच जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या नाका तपासणी पथकाला एम.एच.19 सी.झेङ 8569 या कारमध्ये 08 लक्ष 65 हजार 100 रुपये सापडले. या प्रकरणी तक्रार जिल्हास्तरावर पाठविण्यात आली आहे.
जिल्ह्यात 01 हजार 989 मतदान केंद्रावर करण्यात आले वेब कास्टिंग
जिल्ह्यातील जळगांव आणि रावेर या दोन्ही मतदार संघातील सोमवारी (दि.13) मतदान प्रक्रिया पार पडली. मतदान प्रक्रिये दरम्यान घडणारे अनुचित प्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रथमच वेब कास्टिंगची सुविधा करण्यात आलेली होती. या वेब कास्टिंगचे लाईव्ह प्रसारण पाहण्यासाठी अल्प बचत भवन येथे स्वतंत्र कंट्रोल रुम उभारण्यात आली होते. जिल्ह्यातील दोन्ही मतदार संघात 01 हजार 989 मतदान केंद्रावर लाईव्ह वेब कास्टिंग करण्यात आले.
तर, जळगांव लोकसभा मतदार संघातील मतदान केंद्रावरील सुश्म हालचाली टिपण्यासाठी जळगांव लोकसभा मतदार संघात येणाऱ्या सर्व विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रावर एकुण 262 सुश्म निरीक्षक नेमण्यात आले होते, तर लोकसभा मतदार संघात 528 सूक्ष्मनिरीक्षकांची नेमणुक करण्यात आलेली होती.